Friday, January 24, 2014

"मास्टर प्लॅन" ही कथा "लोकप्रभा"त प्रकाशितमाझी "मास्टर प्लॅन" ही कथा साप्ताहिक "लोकप्रभा" च्या २४ जानेवारी २०१४ आणि ३१ जानेवारी २०१४ या अंकांतून दोन भागांत प्रकाशित झाली आहे.


मास्टर प्लॅन - पूर्वार्ध : http://issuu.com/lokprabha/docs/24_january_2014_issue_for_website
पान क्रमांक ४२,४३ आणि ५३

मास्टर प्लॅन - उत्तरार्ध :  http://issuu.com/lokprabha/docs/31_january_2014_issue_for_website
पान क्रमांक ४६, ४७ आणि ४८

Friday, June 7, 2013

सूड - २

नमस्कार मित्रांनो, माझ्या आधीच्या सूड ह्या कथेत एक पुरुष हा नायक होता. तर या सूड कथेत स्त्री ही नायिका आहे. लवकरच ही कथा मी पूर्ण करेन. तोपर्यंत वाचकांसाठी ही  कथेची सुरुवात  
---------------------------
सूड - २ 

सागराच्या थंडगार लाटांच्या स्पर्शाने कधीतरी तिला जाग आली. तिचे अंग पूर्ण बधीर झालेले होते. एक सेकंद तिला काही कळालेच नाही. दुसर्‍याच क्षणी तिच्या अंगात वेदनांचा डोंब उसळला आणि तिचे सर्वांग संतापाने कापू लागले. कमरेच्या खालचा भाग थरथरत होता. आहे त्या पालथे पडलेल्या स्थितीतच ती मुसमुसून रडू लागली. कारण तिच्यावर बलात्कार झाला होता. वासनेने वखवखलेल्या चार नराधमांनी तिच्यावर अत्यंत पाशवी असा बलात्कार केला होता. बराच वेळ रडत होती ती. शेवटी कसला तरी निश्चय केल्यासारखी ती कशीबशी   रांगत कोरड्या वाळूत आली. तिला तीव्र वेदना होत होत्या. संपूर्ण कंबर पुढून आणि मागून ठणकत होती. सगळ्या शरीराची आग आग होत होती. बर्‍याच वेळाने ती तेथून उठली व इकडे तिकडे पडलेले तिचे तोकडे कपडे उचलून परिधान करु लागली. अजूनही पूर्ण अंधारच होता. पण पूर्व दिशेला क्षितिजाच्या रेषेवर सूर्योदयाची चाहूल लागत होती. कपडे घातल्यावर तिला जरा बरे वाटले. पण तिच्या मनात खोलवर एक कधीही न भरली जाणारी जखम झाली होती आणि त्या जखमेची वेदना तिला स्वस्थ बसून देत नव्हती. 

समुद्राच्या त्या वाळूत मोठ्या शिलांनी एक बाजू व्यापलेली होती त्या आडोशातच तिच्यावर अमानुषपणे तो बलात्कार झाला होता.  पूर्वेला लाली फाकू लागली तशी ती भानावर आली नि मनोमन तिने निश्चय केला  की त्या चारही नराधमांवर सूड उगवायचा. 

Sunday, November 20, 2011

मास्टर प्लॅन (कथा)

मीमराठी.नेट या संकेतस्थळाच्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

दुवा: http://www.mimarathi.net/diwali2011/


खुलासा:

सदर कथा काल्पनिक असून त्याचा कोणत्याही घटनेशी वा व्यक्तीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा. सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता. मात्र कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे. लेखकाकडे या कथेचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत

धन्यवाद,

सागर भंडारे


सुरुवातः
११ जुलै २००६ - मुंबईत सात ठिकाणी सिरियल बॉम्बस्फोट
१५ जुलै २००६ - झारखंड मधील बरियातू येथे एका सिमी सदस्याच्या घरी छापा
१५ जुलै २००६ - पाकीस्तानशी चर्चा आमच्या अजेंडात नाही - परराष्ट्र खात्याचे वक्तव्य.. मास्टर प्लॅनची अंमलबजावणी

ठरल्याप्रमाणे रिझर्व बँकेच्या तीन गाड्या निघाल्या होत्या. तिन्ही स्टेशन वॅगन्स कॅशनं खच्चून भरल्या होत्या आणि त्यांतून खास कमांडोज् आपली धारदार नजर सगळीकडे भिरभिरवत हातातल्या हलक्या मशिनगन्स सावरत कॅशला सिक्युरिटी देत होते. शिवाय पुढे एक मागे शेवटी एक अशा दोन मिलिटरीच्या चिलखती गाड्या पूर्णपणे तयारीत होत्या. एवढी जबरदस्त सुरक्षा असताना कॅश पळवण्याचा मूर्खपणा कोणीच करु शकत नव्हते. निदान गेल्या तीस वर्षांत तरी असा प्रयत्न कोणी केला नव्हता. अर्थात ही सिक्युरिटी कायमचीच होती. दर महिन्याला कॅश डिस्ट्रिब्युशनसाठी रिझर्व बँकेच्या तीन वॅगन्स जात असत. सिक्युरिटीत शिथिलता येऊ नये म्हणून प्रत्येक वेळी कमांडोज बदलले जात असत. आपात्कालीन योजनेचा भाग म्हणून दर महिन्याला रिझर्व्ह बँकेतून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमेरिकन डॉलर्सचा भला मोठा साठा मध्यप्रदेशातील बुर्हाणपूरच्या थोडेसे पुढे एका गुप्त ठिकाणी साठवला जात असे. एवढ्या अभेद्य सिक्युरिटीतून कॅश पळवणे कोणालाही शक्य होणार नाही असे जनरल रिबेरो यांचे मत होते. आज त्यांच्या या विश्वासाला तडा जाणार आहे याचा विचार करुनच 'जॅक हायनर' ला हसू येत होतं. जॅकनं ती कॅश पळवायचं ठरवलं होतं. अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवणं हा तर जॅकच्या डाव्या हातचा मळ होता. अभेद्य समल्या जाणार्या सर्व सुरक्षा व्यवस्था जॅकच्या अफलातून डोक्यामुळे भेदल्या जात.

जॅक हा मूळचा अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीतला. लहानपणापासूनच चोरांच्या सान्निध्यात वाढलेला. आज तो जगातला ए-वन रॉबर होता.जॅकचा बँका लुटण्यात हातखंडा होता. पण याव्यतिरिक्तही अनेक धंदे तो करत असे. जॅकचा त्याच्या सुपीक मेंदूवर विश्वास होता आणि आत्तापर्यंतच्या कामगिर्यांनी तो सार्थ ठरविला होता. जॅक पॅरिसला असताना त्याच्याशी स्वामी शेट्टी ने कॉन्टॅक्ट केला होता. नुकताच एका कोट्याधीशाला लुटून मौजमजेसाठी जॅक अमेरिकेहून फ्रान्समधे आला होता. खरं तर त्याला पॅरिस सोडवत नव्हतं, पण पैसा हे त्याचे दैवत होते आणि आपल्या व्यवसायाशी तो पूर्णपणे एकनिष्ठ होता.

भारतात येताना त्याने आपले फक्त पाच साथीदार बरोबर आणले होते. झुबी मार्कोनी, टोनी गॉर्डन, गॅरी कार्टर, रेक्स हेसलर जेनिफर रॉस. हे सर्वजण जॅक हायनरचे सर्वात विश्वासू साथीदार होते.

. ...आणि रॉबेरीचा बेत ठरलाप्लॅन प्रमाणे सर्वजण पर्यटनाच्या व्हिसावर वेगवेगळ्या मार्गांनी भारतात आले. वेळ घालवता ताबडतोब सर्वजण दिल्लीतल्या प्रसिद्ध चाणक्यपुरीतील ड्रॅगन रेस्टॉरंट मध्ये जमले होते. तो दिवस होता १० नोव्हेंबर २०११. एका खाजगी रुममध्ये चर्चा करुन सर्वजण चाणक्यपुरीतल्याच एका ठरलेल्या फ्लॅट मधे गेले. स्वामी शेट्टी त्यांचीच वाट पहात होता. फ्लॅटमधे आल्याआल्या जॅकचे सर्व साथीदार कोचवर बसले. फक्त एकटा जॅकच स्वामीसमोरच्या खुर्चीत बसून त्याच्याशी बोलत होता.

जॅकला भारतातून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न शेट्टी करतोय हे कळाल्यावरच जॅकने ओळखलं की 'यावेळी घबाड मोठं असणार' कारण शेट्टी हे नाव भारतात अलिकडे खूप वेळा ऐकण्यात येत होतं विशेषतः मुंबईतल्या बाँबस्फोटानंतर तर जास्तच. एवढा बडा डॉन आपल्याला कॉन्टॅक्ट करतोय म्हणजे मोठी जोखमीची कामगिरी असणार. जॅक शेट्टीमधे सुरक्षित फोननं बातचीत झाली. शेट्टीला रिझर्व बँकेची कॅश पळवायची होती. जॅकनं त्यासाठी भारतात यावं अशी शेट्टीची इच्छा होती. शेट्टी जॅकला सगळी माहिती पुरवणार होता रॉबेरीचा प्लॅन जॅकनंच करायचा होता. या लुटीत शेट्टी गरज लागली तर त्याची माणसेही जॅकला देणार होता ५० टक्के वाटादेखील देणार होता. रिझर्व बँकेच्या पैशाच्या लुटीतील ५०% म्हणजे जॅक हायनरला पाणी सुटले नसते तर नवलच होते. दोन कारणांसाठी जॅकने ही ऑफर मान्य केली. एक म्हणजे अमाप पैसा आणि दुसरे म्हणजे त्याच्या सुपीक मेंदूला आव्हान. भारताच्या रिझर्व बँकेची कॅश जॅकने लुटली असती तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वात त्याच्या करामतीत अजून एक मानाचा तुरा खोचला गेला असता.

"हे रिझर्व बॅंकेच्या व्हॅन्सचे सिक्युरिटी डिटेल्स" हातातले कागद जॅककडे सरकवत शेट्टी म्हणाला.
जॅक त्या कागदांकडे नजर टाकत असतानाच शेट्टी म्हणाला - "मी खूप डोके खाजवले पण ही अभेद्य सिक्युरिटी कशी भेदायची हे मला काही सुचले नाही. पण पैसे तर जबरदस्त मिळणार आहेत हे काम झाले तर. कित्येक कोटी डॉलर्सचा फायदा यात आहे."
जॅक फक्त हुंकारला.
"
आणि तुझ्या प्लॅनमधे उपयोगी पडेल असा हा बहुमूल्य नकाशा मी मिळवलाय." शेट्टी नकाशा टेबलावर पसरवत म्हणाला.
टेबलावर पसरलेल्या नकाशाकडे नजर टाकताच जॅकला कळाले की हा कॅश वॅगन्स चा जाण्याचा मार्ग आहे.
"
जॅक, तुझा तुझ्या मेंदूवर विश्वास आहे आणि त्याच्या साहाय्याने तू ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडशील याची मला पूर्ण खात्री आहे. तरीही तुला माझ्या माणसांची मदत होणार असेन तर ती मी आनंदाने करायला तयार आहे. तुमच्या सर्वांची रहायची सोय मी याच आलिशान फ्लॅटमध्ये केली आहे. प्लॅन नक्की झाला की सांग मग, पुढची व्यवस्था करुयात. अच्छा परत भेटूया ... गुडनाईट फ्रेंड्स...."शेट्टी बकबक करुन गेल्यावर जॅक शांतपणे इझी चेअरमधे रेलून विचार करायला लागला. जॅकचे एक वैशिष्ठ्य होतं, ते म्हणजे कोणतीही कामगिरी कशी पार पाडायची हे ठरविण्यापूर्वी ती कामगिरी पार पाडण्याची तारीख आधी ठरवित असे. आणि शेवटचे दोन दिवस रिहर्सलसाठी ठेवत असे. त्याप्रमाणेच जॅकने आधी २० नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली. मग आपण इथे येण्याचे कारण पूर्णपणे विसरुन जॅक आपल्या साथिदारांसोबत पोटपूजा करण्यात मग्न झाला.

जॅक जरी अमेरिकन असला तरी त्याला इंग्रजी भाषेबरोबरच इतर नऊ भाषांचे ज्ञान होते. जॅकला हिंदी देखील त्याला व्यवस्थितपणे येत होती. हिंदी व्यतिरिक्त त्याला फारसी, अरेबिक, उर्दू, स्पॅनिश, रशियन अशा वेगवेगळ्या नऊ भाषांचे ज्ञान होते. खुद्द त्याच्या सहकार्यांनाही जॅकच्या अशा सुप्त गुणांचा शोध कामगिरीच्या वेळीच लागे. जगातील पैसे असलेल्या बहुतेक सर्व देशांतील गुंडांशी संबंध आल्यामुळे विविध भाषांशी संपर्क आपोआप होत असे. जॅक अशा आयत्या आलेल्या संधीला अजिबात सोडत नसे शक्य तेवढे शिकत असे. इंटरपोलने एकदा जॅकला पुराव्यासकट पकडण्यासाठी जाळे विणले होते पण एका अरबी व्यावसायिकाच्या रुपाने अस्खलित अरेबिक बोलून त्याने स्वतःची मोठ्या कुशलतेने सुटका करुन घेतली होती. तर या विविध भाषा येण्यामागचा फायदा जॅकनं अचूक ओळखला होता म्हणूनच अत्यंत मेहनतीने त्याने या सर्व भाषा आत्मसात केल्या होत्या.

. मास्टर प्लॅनच्या प्रतिक्षेत शेट्टी

आज १५ नोव्हेंबर चा दिवस होता. शेट्टी त्याच्या केबिनमधे बसला होता. आरामशीर खुर्चीत रेलून दोन्ही पाय टेबलावर टाकून शेट्टी डोळे मिटून पडला होता. हलकीशी डुलकी लागायच्या सुरुवातीच्या अवस्थेत तो होता. पहिले पाच दिवस जॅकनं वाया घालवलेले पाहून शेट्टीला शंका यायला लागली. कारण या पाच दिवसांत जॅकनं शेट्टीला मुळीच संपर्क केला नव्हता. आणि आता संध्याकाळचे आठ वाजत आले होते. तेवढ्यात शेट्टीसमोरचा टेलिफोन खणखणला. शेट्टी त्या आवाजाने खडबडून जागा झाला टेलिफोनकडे झेप घेतली.

"हॅलो स्वामी?"

जॅकचा आवाज ऐकताच शेट्टीचा जीव भांड्यात पडला. जॅकच्या मनात काहीतरी काळंबेरं आलं असावं अशी शंका त्याच्या मनात नुकतीच आली होती. पण जॅकचा उत्साहाने भरलेला आवाज ऐकून त्याची शंका लगेच मिटली.

जॅक नेहमी वेगळी नावे धारण करायचा, यावेळी तो माईक स्लॅटर या नावाने एका अमेरिकन टूरिस्ट च्या नावाने भारतात आला होता. स्वामीची टेलिफोन लाईन थेट आणि एकदम सुरक्षित होती, त्यामुळे या फोनवरचे संभाषण एवढ्या उघडपणे चालले होते.

"हॅलो स्वामी, माईक बोलतोय. गेल्या पाच दिवसांत तुला कॉन्टॅक्ट केले नाही म्हणून तू नक्कीच वैतागला असशील. पण हे पाच दिवस मी फुकट नाही घालवले. माझा सगळा प्लॅन तयार आहे."

"काय सांगतोस?" हे ऐकून स्वामी ताडकन् बसल्या जागेवरुन उडाला. "कमाल आहे तुझी, बसल्या जागेवरुन तुझा सगळा प्लॅन रेडी?"

"अगदी मास्टर प्लॅन." हसत जॅक म्हणाला... "हा प्लॅन तयार करताना तुझ्या माहितीचा खूप उपयोग झालाय मला. तर मग उद्यापासून रिहर्सल सुरु करायची ना?"

"म्हणजे? मी समजलो नाही." गोंधळून जात शेट्टीने विचारले.

पलिकडून जॅकच्या हास्याचा मोठा गडगडाट शेट्टीला ऐकू आला. थोड्या वेळाने हसू आवरुन जॅक त्याची योजना सांगू लागला- "माझ्या मास्टर प्लॅन मधे तुझ्या माणसांचा सहभाग आहे म्हणून मी तुला रिहर्सलचं विचारलं."

"असे आहे होय?, मला वाटलं तुला वेडाचा झटका आला की काय?" जॅकला कोपरखळी मारत स्वामी उद्गारला.

शेट्टीचा विनोद जॅकला आवडला नव्हता. मनातल्या मनात जॅकनं त्याला हजार वेळा शिव्या मोजल्या. हा कोण मोठा टिकोजीराव लागून गेलाय म्हणून... मला वेडाचे झटके येतील काय?.... योग्य वेळी तुला माझ्या मेंदूची कमाल दाखवेनच असा मनोमन निश्चय करुन जॅकने फक्त हसून स्वामीला प्रत्युत्तर दिले.

"उद्या सकाळी दहा वाजता मला भेटायला ये" एवढे सांगून जॅकने फोन ठेवून दिला.

जॅकचा प्लॅन पूर्णपणे निर्दोष होता. त्याने खूप विचार करुनच हा प्लॅन तयार केला होता. खरंतर शेट्टीच्या माणसांची मदत घेणं जॅकच्या आजपर्यंतच्या कामगिर्यांशी पूर्णपणे विसंगत होतं. पण ते करणं जॅकला भागच होतं. कारण भारत म्हणजे युरोप किंवा अमेरिका नव्हते. वेशांतर करणं हा जॅकचा आवडता खेळ होता. पण मूळची विदेशी गोरी कातडी लपवणं जॅकच्या बापालाही शक्य नव्हतं. शिवाय काही वर्षांपूर्वीच जॅकनं अमेरिकेची सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध..?) गुप्तहेर संघटना सी.आय.. तर्फे एक मोठी गुप्त कामगिरी भारतातच पार पाडलेली होती. त्यामुळे एका विदेशी व्यक्तीचे दिल्लीतले उघड उघड वास्तव्य लगेच डोळ्यांवर येऊन त्यालाच हानीकारक ठरण्याची शक्यता होती. सर्व गोष्टींचा जॅकनं पूर्णपणे विचार केला होता. वीस तारखेला भारतीय रिझर्व्ह बँकेची (R.B.I.ची ) भली मोठी कॅश जॅक आणि शेट्टीच्या मालकीची होणार होती. शेट्टीने जॅकला खिजवलं होतं, त्यामुळे जॅक आधी ठरल्याप्रमाणे करता कॅश हातात आल्यावर शेट्टीला डच्चू देणार होता. त्या कल्पनेनंच जॅकला ह्सू यायला लागलं.

इकडे जॅकनं कॉन्टॅक्ट केल्यावर शेट्टीचा उत्साह शतपटींनी वाढला आणि भराभर त्याने फोनवरुन हुकूम सोडले. दहा मिनिटे तो नुसता फोनवर हुकूम सोडत होता. दहा मिनिटांनंतर तो निर्धास्तपणे इझी चेअरवर रेलून चक्क झोपला. दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्याचं खास लढाऊ स्क्वॉड पूर्ण तयारीत असणार होतं.

. जॅकचा अफलातून मास्टर प्लॅन

शेट्टी आणि जॅक समोरासमोर बसले होते. जॅक प्लॅन सांगणार होता. जॅकचे साथीदार आणि शेट्टी फक्त ऐकण्याचे काम करणार होते. नकाशा टेबलावर पसरलेला होताच. आवडत्या मार्टीनीने भरलेला ग्लास रिकामा करुन मगच जॅकने टेबलावर झुकून त्याचा 'मास्टर प्लॅन' सांगायला सुरुवात केली.

"हा ॅनी बेझंट स्ट्रीट. शहराला वळसा घालून जाणारा हा मार्ग फारशा वर्दळीचा नाहिये. त्यामुळे आर.बी.आय. च्या कॅश व्हॅगन्सच्या दृष्टीने हा रस्ता जास्त सुरक्षित आहे. जिथे कॅश वॅगन्समधून भरली जाणार आहे त्या आर.बी.आय.चे कोषागार शहराच्या थोडे बाहेरच्या बाजूला असले तरी त्यांची सुरक्षा व्यवस्था अगदी अभेद्य अशी आहे. त्यामुळे तिथे कॅश लुटता येणार नाही. या बँकेच्या अगदी समोर एक साधा रस्ता आहे. तो थेट मिलिटरी बेस कॅम्पवर जातो. तेथूनच कमांडोज येतात. तर या बेस कॅम्पपासून आपल्या कामगिरीचा पहिला टप्पा सुरु होतो. मेजर अग्निहोत्री कमांडों निवडण्याचे काम करतात. हे सगळे कमांडोज सकाळी सात वाजता निवडले जातात, तो पर्यंत कोणालाही याची माहिती नसते. मेजर अग्निहोत्री हा मद्य आणि मदिराक्षी यांचा चाहता असला तरी कट्टर देशभक्त आहे त्यामुळे तो विकला जाणार्यांपैकी नाहिये. पण मेजर अग्निहोत्रीच्या अनुपस्थितीत हे काम कॅप्टन कपूर कडे असते. आणि या कॅप्टनला कायम पैसा लागतो. तो मिळवण्यासाठी नेहमी योग्य आणि खात्रीशीर संधीची वाट तो बघत असतो, त्यामुळे वर वर कट्टर देशभक्ताचा बुरखा पांघरुन असलेल्या या मेजर कपूरला आजपर्यंत कोणी पकडू शकलेलं नाहिये." जॅककडे मेजर कपूरची एवढी सखोल माहिती उपलब्ध असलेली ऐकून एक क्षणभरासाठी शेट्टीच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली होती. शेट्टीला वाटलेल्या आश्चर्याकडे दुर्लक्ष करुन जॅक पुढे बोलू लागला -

"शेट्टी, या मेजर कपूरच्या मदतीने तुझी माणसं कमांडोजच्या ग्रुपमध्ये घुसवणं जास्त जड जाणार नाही. शिवाय कॅम्पमधले कमांडोज सतत बदलले जात असल्याने आपल्या माणसांना कोणी ओळखण्याची भितीही नाही. या मेजर अग्निहोत्रीला संभाळायचे काम जेनिफर करेल."

"काय जेनिफर?" मिस्किलपणे तिच्याकडे हसत जॅक उद्गारला.

यावर जेनिफरने फक्त स्मित केले. जॅक बोलत असताना कोणीही बोलायचे नसते हा संकेत तिला माहित होता.

जॅकने पुढे बोलायला सुरुवात केली - "सकाळी सिक्युरिटी सिलेक्शनच्या वेळी हा अग्निहोत्री उठणारच नाही."

"ही जी लाल फुली दिसते आहे" दिल्लीपासून बर्याच दूर अंतरावर असणार्या एका लाल फुलीकडे सर्वांचे लक्ष वेधत जॅक बोलू लागला -

"तिथे आपल्या कामगिरीचा दुसरा टप्पा सुरु होतो. या मिलिटरी कॅम्पमधून दोन शस्त्रसज्ज अशा खास चिलखती गाड्या कमांडोज कॅम्पला पाठवल्या जातात. त्या गाड्यांतील लोकांना वाटेतच गाठून त्यांच्या ड्रायव्हर्सची जागा टोनी रेक्स घेतील. आणि प्रत्येक गाडीत जे चार - चार कमांडोज असतील त्यांची जागा कॅप्टन कपूरच्या मदतीने शेट्टी तुझ्या माणसांनी अगोदरच घेतलेली असेल. मिलिटरीच्या या चिलखती गाड्यांची चेकींग कधी होत नाही कारण ती थेट मिलिटरी बेस कॅम्पवरुन आलेली असतात. "

"ड्रायव्हर्सची अदलाबदल झाल्या नंतर या चिलखती गाड्या नेहमीच्या रुटनं कमांडोज घेऊन रिझर्व बँकेच्या कोशागारापाशी जाईल. बँकेतून कॅश घेतल्यावर तिन्ही वॅगन्स दोन चिलखती गाड्यांच्या पहार्यात बेझंट स्ट्रीटनं जातील आणि हळू हळू दिल्ली बाहेर पडतील. दिल्लीपासून सुमारे साडेनऊशे किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशातील खांडवा या प्रसिद्ध पण छोट्याशा शहराच्या पुढे एक गाव आहे - बुर्हाणपूर. तिथेच आपल्याला कॅश पळवायची आहे, ती पण अगदी सहज.”
शेट्टीने 'मान गये उस्ताद' अशा अर्थाने डोके हलवले. आरबीआयच्या कॅश साठवण्याच्या गुप्त ठिकाणापासून एवढ्या जवळ ही रॉबेरी कोणी करु शकेल असा विचार कोणीच करु शकणार नाही असे त्याच्या मनात आले. जॅक त्याच्या कामात एवढा उस्ताद का आहे हे त्याला हळू हळू कळू लागले होते.

आपल्या कमांडोज पैकी प्रत्येकाकडे हे बॉम्ब्स असतील." आपल्या हातातला एक बॉम्ब उंचावत जॅक म्हणाला.

ते बॉम्ब म्हणजे नळकांडेच होते एक प्रकारचे. हा नळकांडी बॉम्ब म्हणजे जॅकच्याच सुपीक मेंदूचा एक शोध होता. क्लोरोफॉर्मचा वापर करुन तो बॉम्ब तयार केला होता. त्याचे सील काढताक्षणी त्यातून निघणार्या धुराने आजूबाजूच्या वीस फुटांतील माणसे बेशुद्ध होऊन पडायची.
दोन्ही चिलखती गाड्यांतून शेट्टीची माणसे आणि जॅकचे ड्रायव्हर्स असले तरी कॅश भरलेल्या तीन्ही वॅगन्समधून मात्र प्रत्येकी कमांडोज अगोदरपासूनच असत. ती सुरक्षा कोणाच्या अखत्यारीतील होती ही माहिती काही जॅकला मिळाली नव्हती. पण त्याने फारसे बिघडणार नव्हते. मोठ्या जाळ्या असल्यामुळे ते नळकांडी बॉम्ब या तिन्ही वॅगन्समधील कमांडोज आणि ड्रायव्हर्सना सहज आपल्या जाळ्यात ओढू शकणार होते. तर बॉम्ब फोडण्यासाठी पुढील चिलखती गाडी टोनी अचानकपणे थांबवणार होता. टोनी आणि रेक्स यांनी वॅगन्स थांबविल्या की झुबी मार्कोनी, टोनी गॉर्डन, आणि गॅरी कार्टर हे तिघे प्रत्येकी एक याप्रमाणे कमांडो रुपातील शेट्टीच्या माणसांच्या साहाय्याने वॅगन्सची काळजी घेणार होते. रेक्स हेसलर कडे अचानकपणे कोणती अडचण आली तर त्याकडे लक्ष देण्याचे काम होते. जॅक मात्र या थरारक रॉबेरीचे सूत्रसंचालन करणार होता. त्यापुढचं काम अगदी सोपं होतं. सगळी कॅश, वॅगन्समधून काढून व्हॅन्समध्ये भरायची होती.

किमान दोन तास तरी कॅश व्हॅन्समधील कोणताही कमांडो आणि ड्रायव्हर उठणार नव्हता. त्यामुळे कॅश पळवली गेलीय हे लवकर कळणार नव्हते आणि कळाल्यावर कोणाही कमांडोला करण्यासारखे काही उरणार नव्हते. तर असा जॅकचा मास्टर प्लॅन होता. शेट्टीचे जे लोक कमांडोज म्हणून जाणार होते त्यांच्यासाठी मास्क्स दिलेले होते. त्यामुळे त्या बॉम्बचा कुठलाही परिणाम त्यांच्यावर होणार नव्हता.

. सावज जाळ्यात अडकले

ठरल्याप्रमाणे सगळं घडत होतं. जेनिफरने मेजर अग्निहोत्री सकाळी लवकर जागा होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली होती ती प्लॅन प्रमाणे लगेच दिल्लीवरुन लंडनला जाणारी पहिली फ्लाईट पकडून पलायन केले होते. ॅनी बेझंट स्ट्रीटवर ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर्सची जागा टोनी रेक्सने घेतलेली होती. तिन्ही वॅगन्स बर्हाणपूरपाशी आल्या आणि बॉम्ब फुटल्याचे हलके स्फोट ऐकू आल्यावर लगेच आडोशाच्या झाडीत दडून बसलेल्या जॅक शेट्टी त्यांच्या सहा व्हॅन्सनी त्या तिन्ही वॅगन्स घेरल्या. तिन्ही वॅगन्स मधील ड्रायव्हर्स बेशुद्ध पडले होते. सिक्युरिटी द्यायला आलेल्या दोन्ही चिलखती गाड्यांतील कमांडोज काही कळायच्या आतच बेशुद्ध पडले होते. जॅकने इशारा करताच शेट्टीच्या माणसांनी कॅश बॉक्सेस व्हॅन्स मधून ठेवायला सुरुवात केली. जॅक त्यावेळी बुर्हाणपूरपासून ४० किलोमीटर अंतरावर जय्यत तयारीनिशी असलेल्या अस्लम सुलेमानच्या साहाय्याने शेट्टीला डच्चू देण्याच्या प्लॅन ची मनातल्या मनात उजळणी करत होता. शेट्टीच्या नकळत जॅकने अस्लम सुलेमानशी संधान साधून हा बेत आखला होता. शेट्टीने जॅकला वेडा म्हटले होते त्याची जॅक पुरेपुर किंमत वसूल करणार होता.

शेट्टीची माणसे कॅश बॉक्स व्हॅन्स मधे ठेवत असताना अचानक सगळा एरिया रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पोलिस व्हॅन्सनी आणि मिलिटरी ट्रक्सनी घेरला गेला. आपण घेरलेलो बघताच जॅकनं शेट्टीच्या माणसांना पोलिसांवर आणि सोल्जर्सवर फायरींग करण्याचा आदेश दिला. पण शेट्टीची माणसे शेट्टीही त्यांच्याकडच्या मशिनगन्सची तोंडे खाली करुन मख्खपणे उभे होते. जॅकला कळेना की शेट्टीला काय झाले?. तेव्हढ्यात एका पांढराशुभ्र शर्ट घातलेल्या गॉगलवाल्या भारदस्त व्यक्तीमत्त्वाच्या एका अधिकार्याने इन्स्पेक्टरला इशारा केला. इन्स्पेक्टर आणि त्याच्या टीमने लगोलग पुढे होऊन जॅक आणि इतरांच्या हातात बेड्या ठोकल्या. अवघ्या काही सेकंदात आपले हात बेड्यांत पाहून जॅक सुन्न झाला. पुढे होऊन त्या अधिकार्याने शेट्टीला हस्तांदोलन करुन म्हणाला -
"
थँक यू भोसले, देशाचा खूप मोठा गुन्हेगार तू पकडून दिला आहेस." हे ऐकताच जॅकच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपल्याला पकडण्यासाठीच हा कॅश रॉबेरीचा सापळा लावला होता.

. खर्‍या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी

"तुम्ही कोणत्याही परदेशी व्यक्तीला असं पकडू शकत नाही. माझ्याकडे शस्त्र नाही, या गुन्ह्याचा आणि माझा काही संबंध नाही. मी केवळ एक पर्यटक आहे." जॅकने युक्तीवाद केला.
"
देशाच्या सर्वोच्च बँकेची कॅश पळवायचा प्रयत्न करणे एवढे कारण तुला अडकवण्यासाठी पुरेसे आहे जॅक" तीव्र स्वरात तो गूढ अधिकारी बोलू लागला. "तुला काय वाटलं, आम्हाला आंतरराष्ट्रीय कायदे माहित नाहीत?. तुला असंच पकडलं असतं तर केव्हाच आंतरराष्ट्रीय राजकीय दबाव आणून तू सुटला असतास. म्हणून तर तुला भारतात आणून या रॉबेरीच्या सापळ्यात अडकवलं. मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मास्टर ब्रेन तूच आहेस हे आम्हाला केव्हाच कळाले होते. तू आम्हाला फसवण्यासाठी सूत्रधार कोणी वेगळाच आहे असा भासवण्याचा प्रयत्न केला होतास. आम्हीही फसलो होतो. पण अचानक या संग्राम भोसलेंने एक महत्त्वाचा दुवा शोधून काढला. तुला पकडायचा प्लॅनही त्याचाच होता. हा संग्राम भोसले तुझ्या माहितीसाठी सांगतो - भारताच्या नव्याने स्थापन झालेल्या गुप्तहेर संघटनेचा एक तडफदार कमांडर आहे. तुला वाटले रॉ आणि सीबीआय वर पाळत ठेवली की भारताच्या सगळ्या हालचाली कळतात. संग्रामच्याच प्लॅन प्रमाणे आम्ही तू सोडलेल्या दुव्यांचा शोध घेऊन महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा देखावा करत होतो, त्याला तू भुललास, आणि बेसावध राहिलास. " त्या गूढ अधिकार्याची ओळख जॅकला अज्ञातच राहिली. इन्स्पेक्टरकडे इशारा करुन त्या गूढ अधिकार्याने जॅक आणि त्याच्या सर्व साथिदारांना घेऊन जायला सांगितले. जॅकनेही चालता चालता मनोमन मान्य केले की हाच खरा मास्टर प्लॅन आहे. आज प्रथमच त्याच्या मेंदूवर कोणीतरी मात केली होती. त्या मोठ्या गाडीत बसताना जॅकच्या लक्षात आले की जेनिफरही आत हताशपणे बसलेली होती.

तीन दिवस जॅक आणि त्याच्या सर्व साथिदारांचा अनन्वित छळ केला गेला. जॅक कितीही निर्ढावलेला गुन्हेगार असला तरी त्याला असल्या शारिरिक यातनांची सवय नव्हती. चौथ्या दिवशीच त्याने सर्व काही सांगायचे कबूल केले. मुंबई बॉम्बस्फोटांमुळे गृहमंत्रालयावर खूप मोठा दबाव आला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वतः सगळी मदत केली होती. संग्राम भोसले हा आधी रॉ मधेच काम करत होता पण त्याला मिळालेल्या माहितीचे महत्त्व ओळखून त्याने त्याचे बॉस रजनीकांत अय्यप्पन यांच्या मदतीने थेट गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. त्याच बैठकीत संग्रामने त्यांना आश्वासन दिले होते की मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार तो पकडून देईन. त्याच्या प्लॅनप्रमाणे गृहमंत्र्यांनी प्रचंड गुप्तता पाळून मिलिटरी, रॉ आणि सीबीआय यांच्यातील निवडक, कमी हुद्द्यांवरच्या पण कार्यक्षम व्यक्ती घेऊन एक 'स्पेशल टास्क फोर्स' ची स्थापना केली होती. त्यांना स्वतंत्रपणे काम करण्यासाठी सर्व काही मदत देऊ केली होती आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारची एक वेगळीच गुप्त संघटना निर्माण झाली आहे याची रॉ , सीबीआय मिलिटरीला कल्पनाही दिली गेलेली नव्हती.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी देशप्रेमाने प्रेरित होऊन संग्राम भोसले 'रॉ' या गुप्तहेर संघटनेत सामील झाला होता. बीदर या आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन्ही राज्यांच्या सीमा जवळ असलेल्या भागात वाढलेल्या वातावरणाचा फायदा संग्रामला आज झाला होता. कर्नाटक-आंध्र प्रदेशातील शेट्टी लोक एकदम टेरर असतात ही माहिती जॅकपर्यंत गेलेली होती. कामगिरी स्वीकारण्याआधी जॅकने शेट्टीचा सगळा इतिहास खणून काढला होता. जॅकचा विश्वास बसू शकेल एवढे पुरावे निर्माण करण्याची काळजी संग्रामने शेट्टीचे रुप घेताना घेतलेली होती. अगदी अस्खलित तेलगु संग्रामला येत होती. (संग्रामची आई तेलुगू होती) त्यामुळे जॅकच्या भारतातील सोर्सेस नी त्याला हिरवा कंदील दिला आणि जॅक भारतात आला. अगदी खालच्या दर्जाचा हेर असल्यामुळे संग्रामचे रिपोर्टिंग, तेही गुप्तपणे, फक्त अय्यप्पन यांच्यापुरते मर्यादित होते त्यामुळे या नवतरुणाची माहिती खुद्द रॉ मध्ये पण कोणाला नव्हती. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अनेक कामगिर्या संग्रामने यशस्वी करुन दाखवल्या होत्या. आणि आज मुंबई बॉम्बस्फोटाचा खरा सूत्रधार पकडून देऊन संग्रामने आपल्या कामगिरीत मानाचा शिरपेच खोचला होता.

जॅक तीन दिवसांच्या छळानंतर पोपटासारखा बोलू लागला. मुंबईतील हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी जॅकला स्वतःला आर्थिक महासत्ता समजणार्या देशाच्या एका कूटनीतीने चालणार्या संघटनेने १० कोटी डॉलर्स जॅकला देऊ केले होते. जॅक पाच तास नुसता सगळी माहिती सांगत होता. नंतर ताबडतोब सगळी सूत्रे गुप्तपणे आणि उच्च पातळीवर हलवली गेली. मुंबई बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांच्या भारतातील सर्व हस्तकांना एकाच वेळी अटक करण्यात आली. एवढे सगळे महाभारत पडद्याआड घडले तरी सामान्य जनतेला या कानाचा त्या कानाला पत्ता नव्हता. तोही दिवस उजाडणार होताच.

२५ नोव्हेंबरची सकाळ उगवली तोच आनंदाचे क्षण घेऊन. भारतातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांतून "मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांची धरपकड" या मथळ्याखाली सर्व आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध केली गेली होती. सर्व लोक टीव्ही वरील न्यूज चॅनेल्सना चिकटून बसलेले होते. या सर्व माहितीत स्पेशल टास्क फोर्सचे नावही कुठे नव्हते, या कामगिरीच्या निमित्ताने गृहमंत्र्यांना या तिसर्या शक्तीचे आणि तिच्या गोपनीयतेचे महत्त्व उमगले होते. या बातमीत कुख्यात गुन्हेगार स्वामी शेट्टीचाही सहभाग असल्याची बातमी मुद्दामच दिली गेली, आणि तो फरार असल्याचे जाहीर केले. भविष्य काळातील कामगिर्यांसाठी या माहितीचा उपयोग होणार होता. संग्राम भोसलेचे नाव कुठेही नव्हते. आपले नाव जाहीर व्हावे अशी त्याची इच्छा देखील नव्हती. संग्राम त्याच्या केबीन मध्ये बसला होता. या क्षणी तो खूप आनंदात होता. आपल्या टास्क फोर्सची पहिलीच कामगिरी यशस्वी झाली याचा त्याला खूप आनंद झाला होताच पण त्याहीपेक्षा त्याला जास्त आनंद या गोष्टीचा झाला होता की मुंबईच्या बॉम्बस्फोटात आपल्या आप्तांना-मित्रांना गमावणार्यांचे अश्रू जरी सुकणार नसले तरी त्यांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान तरी तो देऊ शकला होता......

-समाप्त-