http://www.misalpav.com/node/6174
एकदा मिसळपाव.कॉम वर एका वाचकाने ६ ओळींची लघुकथा लिहिण्याचे आव्हान दिले...म्हटले चला लिहू, त्यात शब्दांची मर्यादा नव्हती... ... तेव्हा मी म्हटले ६ पेक्षा कमी ओळींची भली मोठी कथा लिहू या... त्या कल्पनेतून साकार झालेली ही कथा
अट अशी होती की शेवटचे वाक्य "हेच मला भारतातील आवडत नाही"
अथवा
"म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे"
यापैकी हवे होते
एकदा एका जंगलातून वाघाच्या पाऊलखुणांच्या मागावर जात असताना अचानक कोकीळेची तान ऐकून इकडे तिकडे पाहताना समोरच्या सरोवरात जलक्रिडा करणार्या अप्सरेकडे राजाचे लक्ष जाताच त्याने ठरवले की ह्याच सुंदरीच्या चरणी आपले जीवन अर्पून तिच्याबरोबर केलेल्या सुखाच्या संसाराने आपल्या कुटुंबाचा वृक्ष फुलवता आला तर प्रयत्न करुयात असे ठरवून तो तिच्याजवळ जाऊन त्या सुंदर अप्सरेला म्हणाला की हे सुंदरी तू खूप सुंदर असून माझे चित्त हरपून टाकण्यास कारणीभूत झाल्या कारणाने माझी तुजवर प्रीती जडल्यामुळे तू माझे प्रेम स्विकारावे अशी माझी इच्छा असून माझ्या मुलांची आई जर तू झालीस तर मी तुझा खूप ॠणी तर होईनच पण त्याचबरोबर स्वर्गात मिळणार्या सुखापेक्षा जास्त सुख तुला माझ्याकडून मिळेल यासाठी मी अगोदरच एक सांगू इच्छितो की मी या अमरावती नगरीचा तरुण राजा असून मी अविवाहित असल्याकारणाने योग्य वधूच्या शोधात यश न मिळाल्याने जंगलात शिकार करण्यासाठी आलो असताना मी तुला पाहिले आणि तुझ्या सौंदर्याने मज घायाळ करुन तुझा दास होण्याचीच आता माझी इच्छा असल्यामुळे हे सुंदरी तू माझी हो अशी तुला विनंती करण्यासाठी मी येथे आलो आहे , असे सांगून राजा तिच्या आरस्पानी सौंदर्याचे डोळ्यांनी निरिक्षण करत असताना अप्सरेने ओळखले की राजा आपल्या सौंदर्यावर पूर्ण लुब्ध झाला असल्यामुळे आता आपला हेतू साधता येईन असे ठरवून तिने राजाला सांगितले की हे राजन मी तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी आणि तुला संसारसुख देण्यासाठी तत्पर आणि तयार आहे यात तू शंका बाळगावी असे काहीही नसल्याकारणाने माझ्या २ अटी मी सांगत्ये त्यांची पूर्तता झाली की लगेच मी तुझ्याशी लग्न करुन तुझ्या संसाराचा सुखी वृक्ष फुलवेन हे माझे वचन समजून त्यासाठी तू मला सुवर्णपर्वतावरचा सोनेरी पक्षी आणि त्या पक्षाच्या गळ्यातील लाल माणिक आणून दे म्हणजे मी तुझी इच्छा पूर्ण करेन आणि... पुरे पुरे आता मी तुझ्याकडे तेव्हाच येईन जेव्हा माझ्याकडे सुवर्णपर्वतावरचा सोनेरी पक्षी आणि त्याच्या गळ्यातील लाल माणिक घेऊन मी तुझ्या गळ्यात त्याचा हार करुन घालेन तेव्हाच मला तू वरमाला घालशीन याची मला कल्पना असल्याने मी निघतो आता" असे म्हणून राजा सुवर्णपर्वतावर एकटा तर गेलाच पण अप्सरेच्या अटीप्रमाणे दोन्ही गोष्टी खूप पराक्रम करुन घेऊन येत असताना मनात राजा म्हणाला आपण उत्साहाच्या भरात त्या सुंदर अप्सरेचे नावही विचारले नाही तर आता तिच्या आठवणींना काय नाव देऊ असा विचार करतो न करतो तोच ती अप्सरा उडत येताना दिसताच राजाने हर्षोल्ल्हासित होऊन अप्सरेला नाव विचारायचे ठरवले होते तोच अप्सरा म्हणाली राजन चिंता नसावी ही तिलोत्तमा अप्सरा आता फक्त तुमचीच झाली असल्याने आता त्वरीत आपण राज्याकडे प्रस्थान करुन आपल्या प्रजेला ही आनंदाची बातमी देऊन मोठा सण साजरा करुयात.
राजा नगरात येताच प्रजेला नवीन आणि सुंदर राणी तिलोत्तमेच्या रुपाने मिळाल्यावर प्रजाजन खुश झाले होतेच पण राजाही सातव्या अस्मानात होता असे तिलोत्तमेला वाटत असल्याचे राजा मनोमन जाणून असल्याकारणाने त्याने लगेच तिलोत्तमेला पट्टराणी आणि तिच्या पोटी होणार्या अपत्याला राज्याचा वारस घोषित केल्याबरोबर प्रजाजन आनंदाने नाचू लागल्याचे पाहून तिलोत्तमा लाजून महालात पळाल्यामुळे राजाचा नाईलाज होऊन तोही आत महालात गेला.
पाच वर्षात राजाला तिलोत्तमेने वचन दिल्याप्रमाणे राजकुमार रत्नसेन आणि राजकुमारी सोनलता ही दोन अपत्ये तर दिलीच पण सोनेरी पक्षी आणि लाल माणिक रत्न यांच्या अनुषंगाने त्यांची नावेही तशीच ठेवली.
आता सोनेरी पक्षी आणि माणिक यांचे रहस्य काय हे जाणून घेण्यात वाचकांना सगळ्यात भारी इंटरेस्ट असल्यकारणाने मी वाचकांना एकच सांगू इच्छितो की असल्या ५ वाक्यांची लघुकथा मी कितीही लांबवू शकलो असतो पण स्वतःचे डोके या कामी खर्च करण्यापेक्षा मला वाचणार्या तुम्हा सगळ्यांच्या वेळेची किंमत असल्याकारणाने माझी ५ वाक्यांची कथा इथेच थांबवतो व एकच निदर्शनास आणून देतो की बुद्धिमत्ता आपण कुठेही खर्च करतो.........
हेच मला भारतातील आवडत नाही.
(लघुकथाकार ) सागर (मी एक ओळ वाचवली .... हा हा हा)