Sunday, August 22, 2010

भयंकर षडयंत्र

डिस्क्लेमर :
सदर कथा काल्पनिक असून त्याचे कोणत्याही घटनेशी वा व्यक्तीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा.

वाचक मायबाप आहेत तेव्हा वाचकांच्या सूचनेनुसार सदर कथेतील पात्रे बदलली आहेत.

अवांतरः लेखनस्वातंत्र्यावर मर्यादा आणणार्‍या असल्या कायद्याला आम्ही फाट्यावर मारतो.

*** वेळेअभावी संक्षिप्त स्वरुपात हे कथानक लिहितो आहे. ***


भयंकर षडयंत्र

उपोद्घातः

फेब्रुवारी १९९८
अफगणिस्थानातील तोराबोरा या दुर्गम इलाख्यातील एक प्रशस्त गुहा


आपल्या पॉश सोफ्यावर राजेशाही थाटात पाय पसरुन तो बसला होता. सोनी टीव्ही च्या आलिशान पडद्यावर तो अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्याक्षांचे भाषण लोकांना मंत्रमुग्ध कसे करते हे तो पहात होता. गेली कित्येक वर्षे तो हे करत होता. आपल्या कट्टर शत्रू देशाविरुद्ध तो करत असलेल्या कारवायांना अजून त्याने तितकेसे कठोर रुप दिलेले नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणत होते - ".... अमेरिकेची जगात असलेली अफाट ताकद कोणीही बदलू शकत नाही. अमेरिका विश्वाचे नेतृत्त्व करत आहे आणि यापुढेही करत राहीन...."
येथपर्यंत ठीक होते. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढचे वाक्य चुकूनही बोलायला नको होते असे त्याला वाटू लागले.
"संपूर्ण जगात अमेरिका आणि ख्रिश्चन धर्माला मानणारेच फक्त या जगात नेतृत्त्व करु शकतील...आणि अमेरिकेच्या शक्तीला कोणीही या जगात आव्हान देऊ शकणार नाही एवढे अमेरिकेचे सामर्थ्य आहे याचा मी सर्व अमेरिकन जनतेला विश्वास देतो"
या वाक्याबरोबरच व्हाईट हाऊस समोर उपस्थित लाखो अमेरिकन नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडात अध्यक्षांना अनुमोदन दिले.

हे वाक्य ऐकताच तो खूप उत्तेजित झाला. रागाने त्याने टीव्ही सेट बंद करुन रिमोट कंट्रोल सोफ्यावर फेकून दिले आणि त्याच्या आलिशान खोलीत अस्वस्थ पण निश्चयी मनाने फिरायला सुरुवात केली.

+ + +
रागीट असला तरी तसा तो खूप बुद्धीमान होता. त्याला हिब्रू, अरबी, उर्दू, फारसी यांबरोबरच स्पॅनिश आणि इंग्रजी अस्खलितपणे बोलता येत होते. लंच आणि डिनरच्या वेळी पाळायचे पाश्चात्य शिष्टाचार त्याला पूर्णपणे अवगत होते. तो स्वतः जेवताना काटे चमचे यांचा सर्रास वापर करायचा. पण तरीही तो इस्लामचा कट्टर समर्थक होता. जग हे विज्ञानाच्या मागे धावता धावता विनाशाच्या खाईकडे चालले आहे हे त्याला उघड उघड दिसत होते. तेवढा बुद्धीमान तो नक्कीच होता. आणि विनाशाच्या या अनियंत्रित वेगाला जबाबदार कोणी असेल तर अमेरिका असे त्याचे ठाम मत होते. त्याचे वाचनही अफाट होते. बायबल, कुराण यांबरोबरच गीता, वेद आणि उपनिषदे यांचे सखोल वाचन केलेले होते. त्यामुळेच ज्या काळात इस्लामची निर्मिती झाली होती, तशीच गरज आज इस्लाम चा जगभर प्रसार करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. यासाठीच त्याने इस्लामी जिहाद चा आवाज दिला होता. त्याच्या आवाहनाला अशिक्षित, शिक्षित, अर्धशिक्षित आणि त्यांच्यातीलच मूठभर हिंसक व अत्याचारी लोकांमुळे जगभर तिरस्कार सहन करणार्‍या हजारो इस्लामी बांधवांनी मदतीचा ओघ सुरु केला होता. एवढ्या जबरदस्त प्रतिसादाने त्याचे मनोबल खूपच उंचावले होते.
+ + +

अचानक त्याचा चिंताग्रस्त चेहरा हसरा झाला आणि समाधानाने त्याने एक चुटकी वाजवली. त्याने अमेरिकेला जगासमोर नागवे करायची योजना ठरवली होती. स्वतःशीच तो बोलू लागला:
"आता अमेरिकेला असा धडा शिकवतो की जगात सगळीकडे अमेरिकेचा उपहास होईल आणि अमेरिकेचे जगाच्या नेतृत्त्वाचे स्वप्न सर्व देश हेटाळणीच्या स्वरुपात पाहू लागतील."

त्याने उत्तेजित स्वरात आवाज दिला -

"कासिम... माझ्या हवाई बेटांवर राहणार्‍या कुरेशी चाचांना फोन लाव. त्यांना निरोप दे की मी २ दिवसांनी त्यांना हॉटेल पॅरेडाइजमधे भेटेन. येताना केनियाच्या थोर अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या सर हुसेन यांनाही बरोबर
घेऊन यायला सांग. माझी भेट ते नाकारणार नाहीत.... आणि महमूद कुरेशी या नावाने माझ्या प्रवासाची व्यवस्था कर"
+ + +

एक महिन्यांनंतरः

नुकतेच त्याने हॉटेल पॅरेडाईज सोडले होते. एक प्रवाशी अनेक दिवस येथे मजेसाठी आला होता आणि मौजमजा करुन गेला यापेक्षा हॉटेल पॅरेडाईजला त्याची किंमत नव्हती. विमानतळावर जाताना कॅबमध्ये तो मधूनच स्वतःशीच हसत होता. खूप समाधानी होता तो. त्याच्या डोळ्यांपुढे मागच्या एक महिन्यांतील घटनाक्रम तरळू लागले. कुरेशी चाचांनी ओळख करुन दिलेल्या सर हुसेन यांचे अर्थशास्त्रातील ज्ञान पाहून तो थक्क झाला होता. तशी त्याला कल्पना होती त्यांच्याबद्दल. पण एखाद्या देशाची अर्थव्यवस्थादेखील बदलवून टाकण्याचे सामर्थ्य असण्याइतपत सखोल ज्ञान सर हुसेन आहे याबद्दल त्याला अचंबा वाटत होता. खरेतर आपल्या बुद्धीमत्तेने त्याने सर हुसेन यांना पहिल्याच दिवशी जिंकले होते. पण त्याची निर्दोष योजना सर हुसेन कट्टर इस्लामी असूनही त्यांच्या गळी उतरत नव्हती. यात खूप म्हणजे खूपच धोका होता. अमेरिकेच्या मर्मस्थानावर प्रहार करण्यात प्रचंड धोका होता. मनोमन त्यांनी त्याला खूप मानले होते. शेवटी सलग दहा दिवस त्याने मेहनत घेऊन त्यांना सविस्तरपणे भविष्यकाळाचा पट उतरवून दाखवला होता. त्याच्या योजनेत कुठेही चूक नव्हती. आपल्या धर्मबांधवांच्या नजरेत सन्मानाचे स्थान त्यांना यामुळे मिळणार होते. त्याची योजना पूर्णपणे समजून घेताच त्यांनी दहाव्या दिवशी त्याला होकार दिला होता. नंतरचे पंधरा दिवस दोन अतिशय बुद्धीमान मेंदू ती योजना यशस्वी करण्यासाठी त्यांतील दोष काढून टाकण्यासाठी झिजत होते. यासाठी आखातात तेलसाठ्यांमुळे अब्जावधी डॉलर्स कमावलेले कित्येक शेख त्याला मदत करणार होते.
+ + +


दोन वर्षांनंतर:
ऑगस्ट २००० ची एक संध्याकाळ :

नुकतेच अमेरिकेच्या वॉशिंग्टनवरुन एक विमान न्यूयॉर्क कडे उडाले होते. हे विमान न्यूयॉर्कजवळ येताच उमर खान या तरुणाला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन विलोभनीय टॉवरचे दर्शन घडले. अमेरिकेच्या सत्ता आणि ताकदीचे दर्शन करण्याची संधी अमेरिका सहसा कधी सोडत नाही त्यामुळेच विमान उतरण्यापूर्वी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूती देणार्‍या वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या दोन इमारतींचे अनोखे दर्शन प्रवाशांना घडेल व ते अमेरिकेच्या भव्य दिव्य साम्राज्याने अचंभित होतील हा हेतू बाळगूनच विमान उतरण्याच्या मार्गाची आखणी करण्यात आली होती. उमर खान ने विमानतळावर उतरुन आपली बॅग ताब्यात घेतली.
बाहेर पडताच त्याने फोन केला -
"सलाम वालेकुम कासिमचाचा"
"वालेकुम अस्सलाम उमर...कोई परेशानी?" पलिकडून आवाज आला.
"बिल्कुल नही"
"सब खैरियत?"
"खैरियत"
"अल्ला की मेहेरबानी...अपने मुकाम पर पहुंच जाओ"
"जी चाचा... खुदा हाफिज"
"खुदा हाफिज"

ठरल्याप्रमाणे उमर न्यूयॉर्कमधील ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. त्याला खात्री होती की अमेरिकेच्या लॉस एंजेलिस, बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को, नेवाडा, अशा विविध तळांवरुन न्यूयॉर्क कडे येणार्‍या प्रत्येक विमानातील आपल्या साथीदारांनी काम केले असेल. काम सोपे होते असे त्याला वाटत होते. एक विशेश वस्तू बॅगेतून न्यायची आणि ती सिक्युरिटी चेक मधून पार पडते की नाही हे पहायचे होते. आणि दुसरे म्हणजे न्यूयॉर्क जवळच्या हवाई मार्गाची पाहणी करुन सारा तपशील कासिमचाचांकडे जमा करायचा होता. इस्लामची सेवा करण्याकरिता त्याने आपल्याला निवडले याकरिता उमर त्याचे व अल्लाचे आभार मानत होता. पुढचे काही दिवस हेच रुटीन होते त्यांचे पण उमर आणि त्याच्या २९ साथीदारांनी आत्तापर्यंत एकदम चोख काम केले होते.
+ + +

घटनाक्रमाची सुरुवात:
- ११ सप्टेंबर २००१ - अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर दोन प्रवाशी विमाने धडकली
- ऑक्टोबर २००१ - अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला गति देणारे हे दोन टॉवर्स कोसळल्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला.
- २००७ - जगभरातील अर्थशास्त्री सावध करु लागले.
- २००८ - वॉल स्ट्रीटच्या रुपाने अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळली.
- २००८ - बाकी जगाच्या अर्थव्यवस्थादेखील ताणल्या गेल्या.
- २००८ - सर्व जगभरातील शेअर बाजार कोसळले. अगणित संपत्तीचे नुकसान झाले.
+ + +

- थोडेसे मागे -
सन २००५

ईलिनॉस या अमेरिकेतील एका दुर्लक्षित परगण्यातून बराक ओरामा या एका सिनेटरची निवड झाली. बोलण्याचे चातुर्य ओरामांमध्ये उपजतच होते. पण परिस्थितीचे आकलन करण्याची तीव्र बुद्धीमत्तादेखील त्यांच्याकडे होती. मुख्य म्हणजे ते अमेरिकन नागरिकांना कष्ट करण्यासाठी प्रेरित करत होते. भारत व चीन वर तंत्रज्ञानाच्या ऑटसोर्सिंग च्या धोरणावर कडकपणे टीका करत होते. सर्वसामान्यांमध्ये बेरोजगारी होण्याचे हे एक मुख्य कारण ते मानत होते. बेरोजगारी वाढणार्‍या अमेरिकेत ओरामाना मोठा पाठिंबा मिळून ते सिनेटर म्हणून निवडून आले.

नोव्हेंबर २००८
व्हाईट हाऊसच्या प्रांगणात लाखो लोकांच्या उपस्थितीत बराक ओरामा अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत होते. करोडो लोकांची मने त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणार्‍या वाणीने जिंकली होती. अमेरिकेची जनता ओरामांकडे मोठ्या आशेने पहात होती.

ओरामा अमेरिकेत रोजगार निर्माण करण्याबद्दल ते बोलत होते.
अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणार्‍या अल-कायदा ला नेस्तनाबूत करण्याबद्दल ते बोलत होते. अफगणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याबद्दल ते बोलत होते.
भारत आणि चीन यांच्यावर अवलंबून न राहण्याच्या गोष्टी करत होते.
अमेरिकेत राहणार्‍या सर्व धर्मियांना ते समान वागणूक देण्याबददल ते बोलत होते.
अल-कायदाविरोधातील अभियानात पाकीस्तानने केकेल्या मदतीबद्दल ते बोलत होते.
नासाच्या प्रगतीबद्दल ते बोलत होते.
अमेरिकन नागरिकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष पुरवावे याबद्दल बोलत होते.
अमेरिकन अस्मितेबद्दल बोलत होते
अमेरिकन मुलांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल बोलत होते
अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मजबूत करण्याबद्दल ते बोलत होते

नवनिर्वाचित अध्यक्षांचे भाषण संपताच टाळ्यांच्या कडकडाटात लाखो अमेरिकन नागरिकांनी ओरामांना मानवंदना दिली. आता अमेरिकेवरचे अरिष्ट संपणार या उमेदीने सर्व अमेरिकन नागरिक आनंदात घरी परतले.
+ + +

दोन वर्षांनी:
सन २०१०


अमेरिकन नागरिकांत बराक ओरामांबद्दल रोष वाढू लागला. अमेरिकन अर्थव्यवस्था मूळपदावर आलेली नव्हती. लादेन अजून पकडला गेला नव्हता. अल-कायदाचे पारिपत्य झालेले नव्हते. रोजगार म्हणावे तसे निर्माण झाले नव्हते. शिक्षणरचनेत काहिच बदल झालेला नव्हता. नासाच्या अनुदानात कपात करण्यात आली होती.

पेंटॅगॉनच्या जमिनीखालील एका गुप्त खोलीत एक वरिष्ठ अधिकारी "जॉन सेजविक" त्याच्या संगणकावर काम करता करता एकदम उठून उभा राहिला.
"माय गॉड... जीझस..."
गेली २ वर्षे तो करत असलेल्या मेहनतीला यश आले होते. व्हाईट हाऊसमधून कोणीतरी खूप मोठा खेळ खेळत असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. अमेरिकेच्या सर्व नितींची माहिती बाहेर फुटत होती. कोणीतरी कित्येक वर्षे मुद्दम हे करत होते. आणि जॉन सेजविक अशा निष्कर्षाप्रत पोहोचला होता की अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळण्यामागे व्हाईट हाऊसमधीलच कोणीतरी जबाबदार आहे. नवीन अध्यक्ष बराक ओरामांना अर्थव्यवस्था सुधारण्यात अपयश येणं याचे कारण त्यांची नीती आधीच शत्रूला कळत होती आणि त्याप्रमाणे शत्रू आपली चाल खेळून ती निती फोल ठरवत होता.

कोणावर विश्वास ठेवावा हे त्याला कळत नव्हते. त्याने ताबडतोब पँटेगनचे चीफ रॉबर्ट हावर्ड यांना या सगळ्या प्रकाराची कल्पना दिली. त्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य समजले. तत्काळ हॉटलाईनवर फोन करुन हावर्ड यांनी बराक ओरामांना याची कल्पना दिली.
"प्रेसिडेंट .. व्हॉट कॅन आय डू नाऊ?"
"...." पलिकडे सुन्न शांतता होती.
"प्रेसिडेंट???..."
"रॉबर्ट... अजून कोणाला या प्रकाराची कल्पना आहे?"
"नाही सर..."
"ठीक आहे... सगळे पुरावे घेऊन तू मला ताबडतोब भेट. आणि हो... त्या हुशार अधिकार्‍याचे नाव काय म्हणालास?
" जॉन सेजविक...."
"त्यालाही सोबत घेऊन या. आणि येताना सावधगिरी बाळगा."
+ + +

एक तासानंतरः

अध्यक्षांनी सेजविक व हावर्ड यांना बसण्याकरिता निर्देश केला. अध्यक्षांच्या या साऊंड प्रूफ खोलीत अत्यंत गुप्त अशाच भेटी होत असत. पहाटे तीन वाजता अशी भेट प्रेसिडेंटची घ्यावी लागली याबद्दल दोघांच्या चेहर्‍यावर खिन्नता दिसत होती.
"हं तर काय काय पुरावे मिळाले आहेत? " प्रेसिडेंटनी जॉनकडे पाहून प्रश्न केला...
"सर... व्हाईट हाऊसचे मूळ आदेश जे सिनेट मधे पास झालेले आहेत ते अंमलबजावणी करताना बदलले जात आहेत" सर्व मंजूरी पत्रकांतील ४० टक्के पैसा एका विशिष्ट खात्याकडे वळविला जात आहे. याचे मूळ शोधले सर मी. स्विस बँकेत जाणारा हा पैसा नंतर उझबेकीस्तान, तुर्कमेनिस्तान, सौदी अरेबिया, अफगणीस्तान, पाकीस्तान, बांगला देश, इराण, इराक या सर्व विविध देशांमध्ये ट्रान्सफर होतो आहे."
"तुझा काय अंदाज आहे?"
"सर... व्हाईट हाऊसमधील कोणीतरी उच्च पदस्थच असे करु शकते...म्हणून तुमच्याकडे आलो."
"चांगले केलेत"
अचानक ओरामा उठले व फोनवरुन विलीला(त्यांच्या अंगरक्षकाला) तयारीनिशी आत यायला सांगितले.
हॉर्वर्डला कळाले नाही.-" मिस्टर प्रेसिडेंट विलीला आत्ता कशाला बोलावलेत?...अजून आपले संभाषण पूर्ण झालेले नाहिये"
"हो मला माहिती आहे."
तेवढ्यात विली आत आला.
"विली तुला कल्पना आहे ना काय करायचे याची?
"होय सर" असे म्हणून विली एकदम वळाला आणि रॉबर्ट हावर्ड व जॉन सेजविक यांच्यावर गोळ्या झाडल्या.
एका क्षणात ते मृत पावले.
"या सर्व मूर्ख अमेरिकन लोकांमध्ये हे दोघे थोडे हुशार निघाले" ओरामा आनंदाने उद्गारले. उमर या दोघांच्या बॉडीची विल्हेवाट एका अपघाताने लाव. त्या जॉन सेजविकच्याच खोलीत स्फोट करुन टाक. चुकून एखादा पुरावा राहिला असेल तर नंतर अडचण नको..."

उमरला गदगदून आले. खाली झुकून त्याने ओरामांचा हात धरला. आणि कित्येक वेळा चुंबुन म्हणाला -
"आप इस्लाम का सहारा हो... मै अल्ला का मेहेरबान हूं के मुझे आपकी सेवा करने का मौका मिल रहा है"

हात सोडवून घेऊन ओरामा म्हणाले-
अमेरिकेने स्वप्नातही असा विचार केला नसेन की ज्या 'बिन कासिम' चा शोध आपण तोरा-बोरा च्या दुर्गम भागांत घेत आहोत तोच 'बिन कासिम' अमेरिकेवर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या रुपाने राज्य करत आहे ..." असे म्हणून तो हसू लागला.


उमरच्या डोळ्यांसमोर मात्र सगळा घटनाक्रम लगेच समोर आला. मुल्ला उमर सगळ्या घटनांची अंमलबजावणी करणारा होता तरी त्यामागे जो मेंदू होता तो लादेनचा होता.
- १९ जिहादी शहिदांनी आपले काम चोख बजावून वर्ल्ड ट्रेड सेंटर धराशायी करुन अमेरिकेत दशत निर्माण केली होती.
- सर हुसेन ओरामांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सापळ्यात अडकवून अर्थव्यवस्था कोसळवली होती
- सर हुसेन ओरामांच्या मुलाच्या जीन्स चे बिन कासिमने रोपण करुन घेतले होते. त्यामुळे २ वर्षांत त्याचे शरीरही तरुण झाले होते. बराक ओरामा हेच नाव घेऊन सर बराक हुसेन ओरामा यांच्या मुलाच्या रुपाने अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश केला होता. अचानक २००५ मध्ये सिनेटर झालेला हा बराक ओरामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा झाला या कोड्यात कोणी पडलेच नाही कारण अमेरिकन जनतेची मानसिकता बिन कासिमनी पुरेपुर ओळखली होती.
- मुल्ला उमरनेही जीन्स थेरेपीने स्वतःचा कायापालट करुन घेऊन विल्यम ब्राऊन उर्फ विली या रुपाने बिन कासिमचा अंगरक्षक झाला होता.
- गेल्या दोन वर्षांत अब्जावधी डॉलर्स अमेरिकेतून इस्लामी शक्ती मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या देशांत ट्रान्सफर केले गेले होते.
- इस्लाम आता अधिक मजबूत होणार होता ते ही अमेरिकेच्याच पैशाने....
उमर भानावर आला व आपल्या शिल्लक असलेल्या कामाकडे वळाला.
+ + +

ताजा घटनाक्रमः

२००९ - अल कायदा विरोधी अभियानासाठी मदत करणार्‍या पाकीस्तानला बराक ओरामांनी अब्जावधी डॉलर्सची आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम मंजूर केली
२०१० - अफगणिस्तानातील अमेरिकन सैन्याच्या परतीची प्रक्रिया सुरु केली
२०१० - अमेरिकेने इराकमधील सैन्य पूर्णपणे काढून घेतले
२०१० - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागी मस्जिदीचे निर्माण व त्याला बराक ओरामांचे सर्वधर्मसमभावाच्या नावाने समर्थन
२०१० - पेंटॅगॉनचे प्रमुख व सिनियर ऑफिसर चा पँटॅगन मधील एका विचित्र अपघातात मृत्यू...


*** समाप्त ***


संदर्भः
http://en.wikipedia.org/wiki/Barack_Obama
http://en.wikipedia.org/wiki/Barack_Obama,_Sr.
http://en.wikipedia.org/wiki/Osama_bin_Laden

Wednesday, August 12, 2009

जगबुडी ( कथा)

मित्रांनो,
नौस्ट्रेडेमस ने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे जगबुडी कशी होते यावर आधारित ही कथा आहे.
माझ्या ’जगबुडी’ ह्या कथेचे हस्तलिखित सापडत नाहिये. सापडले की ही कथा पण देईन.
धन्यवाद,
सागर

Tuesday, July 21, 2009

सूड (संपूर्ण कथा)

संपूर्ण कथा पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी PDF येथे क्लिक करा.

~ प्रस्तावना ~

कथा अर्थातच पूर्णपणे काल्पनिक आहे...कोणत्याही गोष्टीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा...इ..इ..आहेच. पण ही कथा वाचण्यापूर्वी माझी भूमिका वाचकांना कळावी असे वाटले म्हणून हे दोन शब्द.भर तारुण्यात प्रवेश करणार्याा युवकाच्या मनःस्थितीचा विचार समोर ठेवून हे कथानक लिहिले आहे. यातील काही व्यक्तीरेखांवर मी स्वत: पाहिल्या असलेल्या व्यक्तींचा प्रभाव असल्याची शक्यता मी नाकारत नाही. पण लहान सहान गोष्टींवरुन टोकाची भूमिका घेणारे अनेक लोक मी स्वतः पाहिले आहेत्...अनुभवले आहेत... आपले स्वतःचेच उदाहरण घ्या ना... घरचा नळ खराब झाला आहे आणि प्लंबर २-३ वेळा येऊनही काम नीट झाले नसेल तर आपण काय करतो? रागाने अंगाचा तिळपापड होतो खूप. त्या प्लंबरच्या डोक्यात हातोडा घालतो आपण. पण ते मनातल्या मनात. मुकाट्याने आपण लगेच दुसरा प्लंबर शोधतो की नाही? आपला कथानायक मनात आलं की करुन टाकतो... पण योग्य वेळी तेवढा संयम आपल्या कथानायकात नक्कीच आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लेखक स्वत: स्त्रीचा खूप आदर करतो. या कथेत दाखवलेले ’सविता’चे पात्र केवळ एका विशिष्ट प्रकारच्या मनोवृत्तीचे द्योतक आहे... तेव्हा सर्व स्त्री वाचकांना विनंती की गैरसमज करुन घेऊ नये. हीच कथा स्त्रीच्या भूमिकेतूनही लिहिता येईन.

थोडे चाकोरीबाहेरचे कथानक असलेल्या ह्या कथेमुळे वाचकांचे किती मनोरंजन झाले हे वाचकांनीच ठरवावे. आपल्या सूचना व अभिप्राय यांची अपेक्षाही आहे आणि त्यांचे स्वागतही...
~सागर भंडारे~
*****************************************











~ सूड ~

आज मी समाधानानं माझी ही सूडकथा तुम्हाला सांगतोय. माझ्यावर जो प्रसंग आला होता त्या परिस्थितीत दुसरा कोणी असता तर जाऊ दे म्हणून माघार घेतली असती. काही माणसे आपल्या तत्त्वांशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात म्हणूनच की काय या व्यावहारीक जगात मानमरातब, पैसा, प्रसिद्धी या गोष्टी त्यांना बघायलाही मिळत नाहीत. आहे त्यात संतुष्ट राहण्याकडे त्यांचा कल असतो. पण त्याउलट असेही दिसते की आपल्या या तत्त्वांच्या आधारेच काही जण प्रसिद्धी, पैसा व मानमरातब या सुखांचा उपभोग घेत असतात. मी माझी गणना पहिल्या प्रकारात करतो. असो... तर आता मी माझ्या कथेकडे (माफ करा सूडकथेकडे) वळतो.
तर माझा स्वभाव हा असा असल्याने त्या छोट्याशा प्रसंगाने माझ्या स्मृतिकोषातील बरीच जागा व्यापली होती. कोवळ्या मनावर झालेले घाव वयाबरोबरच अधिक दृढ होतात असे म्हणतात याचे प्रत्यंतर किमान माझ्या स्वतःच्या बाबतीत तरी मला आले. कोवळ्या वयात घडलेला तो साधा क्षुल्लक प्रसंग. पण तो प्रसंग माझ्या पुढच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. शाळेत मी दहावीत असताना घडलेला प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर अगदी आत्ताच घडल्यासारखा तरळतोय. पण प्रसंग सांगण्याआधी त्यामागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो.....
२० जून १९८९
एस.एच.एस.पी. हायस्कूल, पुणे
आज शाळेचा पहिला दिवस होता. काय होईल अन् काय नाही याची उत्सुकता इतर मुलांप्रमाणेच मलाही लागून राहिली होती. शाळा भरल्याची घंटा वाजली आणि आम्ही सर्व मुले आपापल्या वर्गात पळालो. वर्गात आल्यावर मला दिसले की १०-१२ मुली वर्गात बसल्या आहेत. नववीपर्यंत शाळेला हे शहाणपण सुचलं नव्हतं आणि दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षात मुला-मुलींना एकत्र करण्याचं शहाणपण शाळेकडे कुठून आलं? असा मला मोठ्ठा प्रश्न पडला होता. अर्थात हिंदी चित्रपट पाहून प्रेमाच्या उदात्त विचारांनी भारावून गेलेल्या मुलांसाठी ही पर्वणीच होती. शाळेच्या निकालावर आता परिणाम होणार याची मला शंभर टक्के खात्री होती. आणि बोर्डाचा निकाल लागल्यावर माझा हा अंदाज खराही ठरला. पण निकालावर परिणाम होणार्या् विद्यार्थ्यांच्या यादीत माझाही समावेश असेल याची मला कल्पनादेखील नव्हती. तेव्हा मी अभ्यास एके अभ्यासच करणार, मुलींकडे बघणार नाही, वगैरे उदात्त विचारांनी भारला गेलो होतो. माझी ही भारलेली स्थिती पहिल्या दोन दिवसांतच खाली आली. शेवटी आपल्या वर्गात काय नमुने आहेत याची उत्सुकता होतीच की. पण खरंच मुली चांगल्या होत्या. पहिल्या दोन महिन्यांत बहुतेक सर्व मुली बर्याुच मुलांशी बोलू लागल्या होत्या. गुपचुप वह्यांची देवाण-घेवाण होऊ लागली होती. मधल्या सुट्टीत चर्चा झडू लागल्या. अर्थात त्या भाग्यवान मुलांमध्ये मी नव्हतो. का कुणास ठाऊक मला मुलींशी बोलण्यात भीती वाटायची.
एक दिवस मी मधल्या सुट्टीत गृहपाठ पूर्ण करत बसलो होतो, एकदम हसण्या-खिदळण्याचा आवाज आला. मी सहज मान वर करुन पाहिले तर दोन मुली गप्पा मारताना दिसल्या. एक माझ्या वर्गातली होती. दुसरी मात्र दुसर्या् वर्गातली होती. मैत्रीणीशी बोलायला म्हणून ती आमच्या वर्गात आलेली होती. 'सविता' नाव होतं तिचं. त्या मुलीला मी पाचवीत असल्यापासून पहात होतो. पण आजचं तिचं हास्य मला अधिक भावणारं वाटलं. बस्स त्याच दिवसापासून आमचे डोळे एकमेकांच्या डोळ्यांत अर्थ शोधू लागले....
अरे! तिचं नाव सांगितलं एवढं लांबलचक प्रास्ताविक केलं. माझी स्वतःची माहिती द्यायला नको? मी 'सुंदर बोरुंदे'. सध्या जरी एका गॅरेजमधे काम करीत असलो तरी मी समाधानी आहे. डोक्यावर आता कुठलेही दडपण नाहीये. पाच वर्षांनंतर जरी मी सूड घेतलेला असला तरी आता संपूर्ण तारुण्य माझ्या हातात आहे. स्वतःच्या पायावर उभा राहील इतपत सामर्थ्य माझ्यात नक्कीच आहे...
+ + +
जानेवारी १९९० चा एक दिवस
सारसबाग, पुणे

"सुंदर, असे वाटते की हे दिवस संपूच नयेत. तू मला सोडून तर जाणार नाहीस ना?" तिच्या भावूक आवाजानं माझ्या काळजाला हात घातला.
"तसा विचार देखील मनात आणू नकोस सविता..." मी ही भावूक होत उद्गारलो.

+ + +
या प्रसंगानंतर शाळेची प्रिलियम परिक्षा चालू झाली. पण सविताच्या विचारानं माझ्या डोक्याचा एवढा भाग व्यापलेला होता की त्यात ज्ञानाच्या कणांनाही जागा नव्हती. शेवटी व्हायचे तेच झाले. नववीपर्यंत साठाच्या पुढे टक्के मिळवणारा सुंदर बोरुंदे दहावीच्या प्रिलियम परिक्षेत सहापैकी चार विषयांत पूर्णपणे नापास झाला. इतिहास्-भूगोल व संस्कृत हे आवडीचे विषय होते आणि अवांतर वाचन बरेच असल्याने त्यात पास होण्यास अडचण आली नव्हती. गणितात तर भोपळाच मिळाला होता. रिझल्ट मिळाल्यावर शाळा सुटली. आता परत कोणीही भेटणार नव्हतं. मी वर्गाबाहेर आलो व लगेच सविताच्या वर्गाकडे पळालो. लगेच मला सविता घाईघाईत वर्गाबाहेर येताना दिसली. ती आत्ता भेटली नाही तर तिला मी परत भेटू शकलो नसतो. कारण उद्यापासून शाळेला बोर्डाच्या परिक्षेपर्यंत सुट्टी लागणार होती.
"सविता... सविता" मी तिला हाक मारली. पण तिने मला पाहूनही पाठ फिरवली आणि चालू लागली. मला ते चमत्कारिकच वाटले तेव्हा. पण तरी मी पुढे सरसावलो. तिच्यासमोर थांबून तिचा मार्ग मी अडवला. "सविता आपली भेट आता कुठे होणार?"
माझ्या या प्रश्नावर तिनं पहिली कृती कोणती केली असेल तर ती माझ्या श्रीमुखात भडकविण्याची.
"माझ्यासारख्या सोज्वळ मुलीला असं बोलताना लाज नाही वाटत?"
तिचे हे शब्द ऐकून मला माझ्या पोटात भक्ककन पोकळी निर्माण झाल्याचं जाणवलं. डोकं सुन्न झालं. डोळ्यांत टचकन् पाणी आलं. प्रेमभंगाचा एवढा जबरदस्त धक्का मला पहिल्या-वहिल्या प्रेमातच मिळाला होता. प्रेमभंग म्हणजे काय? हे कथा-कादंबर्यांढतून बरंच वाचलं होतं. पण प्रत्यक्ष अनुभव सहन करताना मात्र मला खूप त्रास झाला. मुलीने मुलाच्या तोंडात मारली म्हटल्यावर बरीच मुलं जमा झाली होती. माझ्याजागी दुसरा कोणी असता तर त्याने सरळ तिच्या तोंडात भडकावून दिली असती. पण मी मात्र निमूटपणे तिथून सरळ घरी निघून आलो.
+ + +

घरी आल्यावर मी उशीत तोंड खुपसुन मनसोक्त रडलो. १ आठवडा मला काहीच सुचत नव्हते.या अपमानाचा सूड घेण्याचे मी तत्क्षणीच ठरवले. स्वतःला कसेबसे सावरुन अगदी थंड डोक्याने सविताने माझ्या निरागस प्रेमाचा केलेल्या अपमानाचा सूड घेण्याचा विचार करु लागलो. पूर्ण प्लॅन मी तयार केला होता. त्यात कुठेही चूक नव्हती. तो प्लॅन मी पाच वर्षांनंतर अंमलात आणणार होतो. संपूर्ण वेळापत्रक मी ठरवले होते. पाच वर्षे मी ह्या सूडाची तयारी करण्यासाठी दिले होते.
संपूर्ण सुट्टी मी अभ्यासावर केंद्रीत केली होती. मी माझ्या बुद्धीमत्तेच्या आणि रात्रंदिवस जागून केलेल्या अभ्यासाच्या जोरावर पास झालो. पण साठाच्या ऐवजी इतर कोणाही सर्वसामान्य विद्यार्थ्याला मिळतात तेवढेच ५१ टक्के मिळाले. काहीच नसण्यापेक्षा हे बरं होतं. माझ्या हातात बोर्डाच्या परिक्षेचा निकाल देताना माझ्या वर्गशिक्षकाचा आ वासलेला चेहरा अजूनही मला आठवतो... नाहीतर काय ... चार विषयांत प्रिलियम मधे नापास झालेला मुलगा बोर्डाच्या परिक्षेत चक्क ५०% मार्क मिळवून उत्तीर्ण होतो हे आश्चर्यच होते त्यांच्यासाठी तरी. खास करुन त्यांच्या स्वतःच्या विषयात - गणितात - मला भोपळा असताना चक्क मला ७५ मार्क होते.
निकाल लागला. मला नू.म.वि. कॉलेजला अॅ डमिशन पण मिळाली. सकाळचं कॉलेज होतं. बारा वाजायच्या आत घरी येऊन मी एका इलेक्ट्रॉनिक्स् च्या दुकानात जात असे. सवितावर सूड उगवण्यासाठी मला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची फार मदत होणार होती. जोडीला रोज सकाळी माझा जोर-बैठकांचा व्यायामही चालू होता. या व्यायामामुळे होणार्याच बलदंड शरीराचा उपयोग मला २ वर्षांनंतर गॅरेजकाम शिकताना होणार होता. माझं संपूर्ण लक्ष सवितावर होतं. तिचं लग्न व्हायची वाट मी पहात होतो. कारण कसबा पेठेसारख्या गजबजलेल्या वस्तीत तिच्या जवळपास जाणंदेखील अशक्य होतं.

ऑगस्ट १९९० ची एक पावसाळी सकाळ

सकाळी कॉलेजमधे जात होतो तेव्हा नुकतेच पावसाचे टपोरे थेंब पडू लागले होते. घराबाहेर पडतानाच पाऊस पडेल असे वाटत होते. आजच्यासारख्या आटलेला पाऊस ७-८ वर्षांपूर्वी नव्हता पडत. पाऊस कसा दमदार असायचा. पडला तर असा मुसळधार पाऊस पडायचा की जणू आभाळ खरोखर रडत आहे असा भास व्हावा ...तर मी अंगात रेनकोट अंगावर चढवूनच घराबाहेर पडलो होतो. एव्हाना मला सविताच्या घराबाहेर पडायच्या वेळा चांगल्या माहित झाल्या होत्या. फडके हौदापासून एक रस्ता थेट वसंत टॉकिजपाशी जातो. त्या रस्त्याने मी भरभर चालत होतो. तेवढ्यात ब्राह्मण समाजाच्या कार्यालयापाशी मला सविता एका उंचापुर्याि मुलाबरोबर दिसली. दोघे एका छत्रीच्या आडोश्याने चालत होते. मी पुरेसे अंतर राखून त्यांच्यामागून जाऊ लागलो. हात थंडीने गारठल्यामुळे मी ते रेनकोटच्या खिशात कोंबले होते. सविताने तीन-चार वेळा मागे वळूनही पाहिलं कोण येतंय म्हणून. पण मी मान खाली घालून चालत होतो. डोक्यावर रेनकोटचीच मोठी टोपी होती. त्यामुळे माझा बराच चेहरा झाकला जात होता. मान खाली घातल्यामुळे ती मला ओळखणार नाही याची खात्रीच होती... माझी नजर जमिनीकडे असली तरी कान मात्र दोघांच्या बोलण्याकडे होते. माझ्यात आणि त्यांच्यात जवळपास सात - आठ फुटांचे अंतर होते.



" किशोर असं वाटतं हे दिवस संपूच नयेत. तू मला सोडून तर जाणार नाहीस ना?"
सवितानं तिच्या त्याच भावूक आवाजात विचारलं हाच भावूक आवाज माझं काळीज भेदून गेला होता, बरोबर सात महिन्यांपूर्वी. तिच्या या प्रश्नाला मी मनातल्या मनात कुत्सितपणे हसलो. आणि तिच्याबरोबर असलेला तिचा मजनू काय म्हणतो याकडे मी उत्सुकतेने कान केले. हे प्रियकर महाशय तिला सांगत होते -
"सविता, जग विरुद्ध झालं तरी मी तुला सोडणार नाही. तुझ्यासाठी मी काहीही करेन."
त्या बिचार्यााची काय चूक म्हणा. 'सविता'च्या प्रेमात वाहून गेलेला 'किशोर'च तो. तिच्या भावूक आवाजामुळे भारावून तिच्यासाठी काहीही करण्याची प्रतिज्ञा तो न करता तर नवलच होते.
+++
एप्रिल १९९२
नुकतीच माझी बारावीची परिक्षा संपली होती. म्हणावा तितका अभ्यास झालेला नव्हता. पण मी पास तर नक्कीच होणार होतो. आणि एकदा पेपर्स देऊन झाल्यावर रिझल्ट्चा तो काय विचार करायचा? कॉलेजमधे मी बरेच मित्र जमा केले होते. त्यात मी ज्या ग्रुप मधे असायचो तो तर कलहप्रिय मुलांचाच होता. कॉलेजची सगळी मुलं-मुली आमच्या ग्रुपला टरकून असायचे. मुलींची छेड काढणे, मारामार्याा करणे हे सारं सारं माझे मित्र करत होते. हे सगळे मित्र सिगारेट , दारु वगैरे व्यसनांत गुरफटले होते. मी मात्र या ग्रुप मधे माझं वेगळेपण टिकवून होतो. एक सज्जन, आदर्श असा मी एकमेव मुलगा या ग्रुपमध्ये होतो. माझे हे सर्व मित्र आया बहिणींवरुन सारखे एकमेकांना शिव्या द्यायचे. त्यांच्या तोंडात हे शब्द असले तरी मनात मात्र तसं नसायचं हे अनुभवावरुन मला माहित झालं होतं. केवळ संगत चांगली नसल्यामुळे ते तसे वागत होते. मला मात्र माझे हे मित्र बराच मान द्यायचे. जेव्हापासून मी या ग्रुपमध्ये आलो तेव्हापासून माझ्या मित्रांनी शिव्यांच्या भाषेत बोलण्याचे प्रमाण बरेच कमी केले होते.
सविता आता अकरावीला होती. दहावीत ती नापास झाली होती. मग बाहेरुन परिक्षा देऊन ती पास झाली होती. आमच्या कॉलेजजवळच तिचे कॉलेज होते. मी मनात आणलं असतं तर मित्रांना सांगून सविताला त्रास देऊ शकलो असतो. पण ही गोष्ट माझ्या स्वभावातच नाही. "जे काही करायचं ते स्वतःच्या हिंमतीवर करायचं. त्यासाठी दुसर्या. कोणावर अवलंबून रहायचं नाही." हे माझं तत्त्व असल्याने मी मित्रांना माझ्या या सूडप्रकरणात भागीदार होऊ दिलं नव्हतं.
मी आता अभ्यासाच्या व्यापातून मोकळा झालो होतो. सुट्टी माझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मला खुणावत होती. मला हवे ते सहकार्य मिळवून देण्याचे मोठे काम या सुट्टीने केले. झाले असे की एक दिवस मी नेहमीप्रमाणे नगर वाचन मंदीराच्या वाचनालयात पुस्तक बदलून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदीराच्या बाहेरच थांबलो. दर्शन घेऊन मी परत जायला वळणार तेवढ्यात माझे लक्ष एका गृहस्थांकडे गेले. साधारण ४२-४५ वयाचे ते गृहस्थ होते. खिशातून रुमाल काढताना त्यांच्या खिशातून शंभराच्या नोटांचे एक बंडल पडले. पुणं कसं आहे ते तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही. त्यामुळे मी तत्परतेने पुढे होऊन ते नोटांचे बंडल उचलून त्या गृहस्थांना म्हणालो -
"सर ! तुमच्या खिशातून रुमाल काढताना हे पैसे पडले होते"
ते गृहस्थ चांगल्या सूटाबुटात होते. त्यामुळे मी त्यांना सर म्हणालो होतो. क्षणभर त्यांनी नोटांकडे पाहिले आणि माझ्याकडे पाहिले. मग एकदम लिंक लागल्यासारखे म्हणाले - " अरे थँक यू.. थँक यू ...."
ते गृहस्थ मला त्या बंडलातील शंभराची एक नोट देऊ लागले. मी नम्रपणे ते पैसे घेण्यास नकार दिला.- "हे माझे कर्तव्यच आहे .. वगैरे...वगैरे..."
एखादे सत्कृत्य केल्यानंतर भारावल्यासारखे मी माझे विचार प्रकट केले.
त्या गृहस्थांनी विचारलं-" काय करतोस?"
मी काय बोलणार?... सांगितलं - " सध्या बारावीची परिक्षा दिली आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत एका इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानात शिकाऊ कामगार आहे. आणि आता संध्याकाळी गॅरेजचे काम शिकायचा विचार आहे."
"अस्सं आहे होय? अरे मग माझ्या गॅरेजमधे येत जा की. तुला माझ्या गॅरेजमधे भरपूर कामही मिळेल आणि पैसेही मिळतील"
मी आनंदाने तयार झालो. माझं लक फारच जोरावर असावं. प्रत्यक्ष परमेश्वरालादेखील माझा हा सूड कदाचित मान्य असावा. कुठल्याशा गॅरेजमध्ये काम शिकायचं होतं तर मला भेटलेला हा गृहस्थ चक्क सुप्रसिद्ध मेहेंदळे गॅरेजचा मालकच निघाला. एवढं मोठं गॅरेज म्हटल्यावर मला भरपूर काम मिळणार होतं. कष्ट उपसायला तर मी तयारच होतो. शिवाय पाचशे रुपये देखील महिन्याला मिळणार होते.
आता माझा दिनक्रम जवळजवळ ठरुनच गेला होता. सकाळी उठून पन्नास जोर-बैठका मारुन झाल्या की झटपट सगळं आवरुन नऊच्या आत मी दुकानात हजर होई. तीन वाजता काम संपलं की साडेतीन पर्यंत घरी येत असे. जेवण करुन थोडा वेळ आराम करायचो व साडेचार ला गॅरेजमध्ये जायचो. तन मन समर्पित करुन मी काम करायचो. घरी परत यायला रात्रीचे नऊ वाजायचे.
माझ्या या कष्टांचे आईला खूप कौतुक वाटायचे. आत्तापासूनच मुलगा कमवायला लागला हे ती फार अभिमानाने शेजार्यां ना आणि नातेवाईकांमध्ये सांगायची. पण माझे हे पाच वर्षांचे कष्ट एका सूडाच्या पूर्तीसाठी होते याची तिला तरी काय कल्पना म्हणा. मी देखील आईचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या दिवशी मेहेंदळेंशी भेट झाली त्याच्या दुसर्याय दिवशी संध्याकाळी त्यांनी मला गॅरेजवर बोलावले होते. त्या दिवशी त्यांनी गॅरेजचे व्यवहार सांभाळणार्यार एका अनुभवी व्यक्तीशी माझी ओळख करुन दिली.
"बहुतुले... हा सुंदर बोरुंदे. आजपासून आपल्याकडे काम शिकणार आहे. आणि सुंदर..."
माझ्याकडे वळून मेहेंदळे म्हणाले - " हे साईराज बहुतुले. येथील सर्व कामगारांवर लक्ष ठेवायचे काम यांचं. आजपासून तुला शिकवण्याचं काम हे स्वतः जातीनं करतील. "
"बहुतुले तुम्ही या पोराला चांगलं तयार करा. पोरगं चांगलं आहे. चला मी निघतो आता.."
असं म्हणून मेहेंदळे तेथून निघून गेले. गॅरेजवर मेहेंदळे फारसे येत नसत. पण जेव्हा येत तेव्हा मात्र माझ्या प्रगतीची ते नेहमी चौकशी करायचे. हे बहुतुले मला उगाच हरभर्यासच्या झाडावर चढवायचे. म्हणायचे - " साहेब, पोरगं फार मेहनती आहे बर का... असेच हा काम शिकला तर कुठलेही बिघडलेलं वाहन हा दुरुस्त करु शकेन. " त्याच वेळी मी मनात म्हणायचो - " आणि कुठलेही चांगले वाहन बिघडवू देखील शकेन.."त्याचसाठी तर मी ही मेहनत घेत होतो. माझ्या मेहनतीचे मला विशेष काही वाटायचे नाही. कारण मी जेवढे कष्ट करतो तेवढेच कष्ट दुसरा कोणीही करु शकतो. फक्त आळस न करता माणसानं मन कामात गुंतवावं लागतं. बाकीचे कामगार काही या प्रवृत्तीचे नव्हते. फक्त पैशासाठी काम करायचे ते सर्व. काहीतरी शिकावे असे त्यांना वाटतच नव्हते. बहुतुलेंनी सांगितले हे कर की ते करायचे.
मी मात्र बहुतुलेंना सारखे विचारायचो - " हा बोल्ट नसेल तर काय होते?... ही वायर महत्त्वाची का? ... ब्रेक ची कार्यक्षमता कशावर अवलंबून असते?...असंच का करायचं? तसं केलं तर काय होईल?...इ...इ..." माझ्या चौकस स्वभावाला बहुतुले मुळीच न कंटाळता मला त्यांची उत्तरे द्यायचे व मी ही या ज्ञानाची नोंद माझ्या मेंदूत करुन ठेवायचो...
+ + +

मे १९९५

आजच परिक्षा संपली. रिझल्ट लागून मी पास झालो की पदवीधर होईन. सूड घेण्याची वेळ आता आली होती. ह्याच सुट्टीत मी एक इलेक्ट्रॉनिक उपकरण तयार करणार होतो. तसा तो शोध माझाच म्हटला तरी चालेल. मी अनेक वेगवेगळे पार्टस एकत्र करुन ते उपकरण तयार करणार होतो.

मी सूड घेण्याच्या इर्ष्येने पेटून पाच वर्षे पूर्ण झाली होती. गेल्या तीन वर्षांत मी आता कोणतीही गाडी दुरुस्त करता येईल असा आत्मविश्वास मिळवला होता. परिक्षा जवळ आल्यामुळे मी मेहेंदळेंना सांगून गॅरेजमधून सुट्टी घेतली होती. परिक्षेनंतर २ महिने गावाला जाणार आहे असेही सांगितले होते. हे २ महिने मी पूर्णपणे स्वत:चा सूड घेण्यासाठी वापरणार होतो.. आता मी इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानात सकाळी नऊ ते रात्री नऊ असा सलग १२ तास काम करायचो. मधे जेवणासाठी तासभर सुट्टी घेऊन घरी यायचो तेवढाच काय तो ब्रेक. माझ्या दुकानाचा मालक एक मुसलमान होता. दर शुक्रवारी माझा मालक काही दुकानात यायचा नाही. तेव्हा दुकान पूर्णपणे माझ्यात हातात असायचे. मी जाणून-बुजूनच असे दुकान निवडले होते की जिथे मला माझ्या प्रयोगांना वाव मिळेन. मात्र माझा मालक हुशार होता यात काही वाद नाही. त्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करायचे व दुरुस्त करण्याचे कौशल्य मान्य केलेच पाहिजे. त्यांच्या घरातला टी.व्ही. आणि टेपरेकॉर्डर (होय त्यावेळी सीडी प्लेयरची क्रेझ नव्हती.) त्याने स्वत: तयार केलेला होता.

मी एक रिमोट कंट्रोल तयार करणार होतो. आणि स्प्रिंगच्या आधाराने दोन धारदार पण छोटीशी पाती असलेली इलेक्ट्रॉनिक कात्री तयार करणार होतो...माझ्या हातातील रिमोटचे बटन दाबल्यावर स्प्रिंगला सेलची पावर मिळून झटका बसणार होता. त्यामुळे दोन पात्यांच्या मधे येणारी कोणतीही वस्तू झटकन कापली जाणार होती. माझ्या या वस्तू तयार करण्यासाठी काय काय लागेल हे मी आधीच माहिती करुन घेतले होते. त्याप्रमाणे मी वेगवेगळ्या क्षमतेचे रेझिस्टर्स , डायोड्स , स्प्रिंग्ज वगैरे सर्व साहित्य घरी आणून ठेवत होतो. बरेचसे साहित्य मी काम करत असलेल्या दुकानातूनच आणत होतो.
पहिल्या शुक्रवारी मी रिमोट कंट्रोलचं सर्किट तयार करणार होतो. त्यासाठी लागणारी तांब्याची तार, एंटेना, एक छोटासा इलेक्ट्रिक चिप-बोर्ड व इतर वस्तू माझ्याकडे होत्या.सोल्डरगन मी दुकानातलीच वापरणार होतो.दुसर्‍या शुक्रवारी मी इलेक्ट्रीक कात्री तयार करणार होतो. आणि तिसर्‍या शुक्रवारी मी स्प्रिंग व सेल कात्रीला जोडून रिमोट वर चालते का नाही ते टेस्ट करणार होतो. साधारणपणे सविता चालवण्यार्‍या गाडीचे ब्रेक फ़ेल करुन तिला अपघाताने मारायचा माझा विचार होता.
+ + +

जुलै १९९५

माझे सर्व काम पूर्ण झाले होते.
आता फ़क्त मी माझी योजना अंमलात आणायचेच तेवढे बाकी होते. मी दहावीच्या त्या प्रसंगानंतर सविताची माहिती तुम्हाला सांगितलीच नाही का? ... आता सांगतो...

मी बारावीत गेलो तेव्हा ती अकरावीत होती. माझ्यासारख्या निष्पाप जीवाला फ़सवल्याची शिक्षा म्हणूनच की काय देवाने तिला दहावीत नापास केले अशी मी माझी समजूत करुन घेतली होती. तर मी बारावी झाल्यानंतर मला सारसबागेत एकदा ती दिसली होती. यावेळी तिच्याबरोबर एक वेगळाच पण हॅंड्सम तरुण होता. अजून दोन वर्षांनंतर मला कळाले की तिचा साखरपुढा झालाय. तेव्हा मी बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला होतो. तिचा साखरपुडा जानेवारीत झाला होता. माझी परिक्षा संपल्यावर मी मोकळा झालो होतो, तेव्हा सविताची मी माहिती काढली तर कळाले की तिनं लव्ह?-मॅरेज केले आहे आणि ती पुण्यातच आहे. तिचा नवरा तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठा होता पण श्रीमंत होता बर्‍यापैकी. सवितानं पैसा पाहूनच लग्न केले असणार याची मला खात्री होती. ती नवर्‍याबरोबर कोथरुडला फ़्लॅट संस्कृतीचा प्रभाव असलेल्या ठिकाणी रहात होती. ही गोष्ट माझ्या पथ्यावरच पडणार होती. कारण फ़्लॅट संस्कृतीतील लोक आपलं घर सोडून फ़ार कोणाशी विशेष संपर्क ठेवत नाहीत. शेवटी मी सवितावर लक्ष ठेवण्याचं ठरवलं.

मी भल्या सकाळीच बाहेर पडायचो. सकाळी सात वाजता सविता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडायची. मस्त फ़्रेश दिसायची ती. लिपस्टीक, पावडर लावून सविताचे मॉर्निंग वॉकला जाणे काही केल्या मला पटत नव्हते. तिचं हे मॉर्निंग वॉक म्हणजे नक्की काय? हे मला लगेच कळाले. सविता तेथून जवळच असलेल्या सुमार दर्जाच्या लॉजच्या एका रुम मधे जायची. आणि साधारणपणे आठ-साडे आठच्या सुमारास एखादी मिळत नसलेली गोष्ट मिळाल्याचा आनंद चेहर्‍यावर घेऊन ती एका बलदंड तरुणाच्या मागोमाग बाहेर पडायची.

सदाशिव पांढरे, सविताचा नवरा, त्याची कुठलीशी फ़र्निचरच्या कामाची फ़र्म होती. असली व्याभिचारी बायको त्याला मिळाली म्हणून मला तिच्या नवर्‍यासाठी खरेच वाईट वाटले होते. म्हणून मी त्यांना भेटून सविता कशी आहे ते सांगायला एका निवांत दुपारी त्यांच्या फ़र्मवर गेलो. फ़र्मचे शटर ओढलेले होते म्हणून सहज कोपर्‍यातल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून नजर टाकली तर तिथे मला भलतेच बघायला मिळाले. सदाशिवराव एका तरूण मुलीच्या शरीराचा उपभोग घेत होते. ती मुलगी नाराज दिसत होती पण चेहर्‍यावर नाईलाजाचे भाव दिसत होते. म्हटले आता पांढरे महाशयांवरदेखील लक्ष ठेवणे आले. आणि लक्ष ठेवून काढलेल्या सगळ्या माहितीने मला हादरवून सोडले.

तेथे अकाऊंटंट म्हणून काम करणार्‍या दोन गरीब मुली होत्या. हा हरामखोर पैशाच्या बळावर त्या दोन पोरींची शरीरे उपभोगायचा. मला त्या दोन गरीब मुलींविषयी खूप सहानुभूती वाटत होती कारण दोन्ही मुलींना वडील नव्हते आणि घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. केवळ पैशासाठी त्या दोन गरीब पोरींना आपल्या शरीराचा नैवेद्य पांढरे महाशयांना द्यायला लागत होता. संतापाची एक तिडीक डोक्यात आली. मी काही समाज सुधारण्याचा मक्ता नाही घेतला. पण समोर अन्याय होत आहे एवढे स्पष्ट दिसत असतानाही मी स्वस्थ बसणे अशक्य होते. गरीबीचा फ़ायदा घेऊन त्या दोन पोरींची शरीरे उपभोगणार्‍या नराधमाला जगात राहण्याचा काहीच अधिकार नाही असे माझे मत झाले होते. सविता एक व्याभिचारिणी आणि तिचा नवराही तसाच भ्रमर वृत्तीचा. दोघांनाही एकाच वेळी नरकाचे द्वार दाखवण्याचे मी ठरवले. मनात हिशोब केला – एकाच्या जागी दोन एवढाच फ़रक. शिवाय त्या गरीब मुलींचे लाचार झालेले निष्पाप चेहरेही माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतेच.
+ + +

१५ ऑगस्ट १९९५

आज देशाचा स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी हे सत्कृत्य करताना मनाला खूप समाधान वाटत होते. दोघे नवरा बायको सिंहगडावर त्यांच्या कार मधून ट्रिपला जाणार होते. काल संध्याकाळी ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते आणि त्यांच्या बोलण्यातूनच हे मला कळाले होते. मला आपला हा सूड पूर्ण करण्याची संधी एवढ्या लवकर मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. मी भल्या पहाटेच उठून त्यांच्या फ़्लॅट पाशी आलो होतो. सावधपणे मी पार्किंग प्लेसमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या मारुती व्हॅनजवळ गेलो. आवाज न करता मी गाडीच्या खाली गेलो आणि स्वत:च्या कमरेस लावलेला टॉर्च हातात घेतला. टॉर्च छोटासाच होता पण माझ्या कामास पुरेसा होता. मी गाडीच्या ब्रेक वायर्सना माझी इलेक्ट्रॉनिक कात्री लावली. गाडीखालून बाहेर आलो तर कुठलसं एक कुत्रं मालकाला आपली इमानदारी दिसावी म्हणून माझ्यावर भुंकत आलं. मी त्याला दगड फ़ेकून मारला तसं केकाटत पळून गेलं. मग मी ही घरी आलो.
+ + +

सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. मी खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहत बसलो होतो. खरं तर मी पोहत नव्हतो. माझं सगळं लक्ष सिंहगड रोडवरुन येणार्‍या नेपच्यून ब्लू कलरच्या मारुती व्हॅन कडे लागलं होतं. पांढर्‍याची कार निळी हा एक विनोदच होता. आधी सविता नवर्‍याबरोबर वाटेतल्या एका हॉलिडे रिसॉर्ट वर जाणार होते. साधारण दहाच्या सुमारास नेपच्यून ब्लू कलरची मारुती व्हॅन सिंहगडाकडे जाताना मला दिसली आणि माझी शिकार आलीय हे मी लगेच ओळखले. सविताचा नवरा गाडी चालवत होता आणि सविता त्याच्या बाजूलाच बसली होती. त्यांनी बरोबर दुसर्‍या कोणाला आणले नव्हते हे बरेच झाले. कारण पापी लोकांपायी दुसर्‍या कोणाचा जीव जावा हे माझ्या मनाला पटले नसते. माझी शिकार सिंहगडावर त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आनंदोत्सव साजरा करायला गेली आणि मी अगदी शांत चित्ताने पोहत बसलो. साधारणपणे पावणे बाराच्या सुमारास मी पाण्याबाहेर आलो. कपडे घालून मी माझ्या सायकलवरुन सिंहगडाकडे कूच केले तेव्हा माझ्या घड्याळात बरोबर बारा वाजले होते. सविता आणि सदाशिव पांढरे यांचेही बारा लवकरच वाजणार होते.

सिंहगडावर जाण्यासाठी दोन रस्त आहेत. एक रस्ता थेट पायथ्यापाशी जातो. हा रस्ता गिर्यारोहणाची आणि दुर्गभ्रमणाची आवड असणारे हौशी पर्यटक वापरतात. आणि दुसरा रस्ता थेट गडावर जातो जो फ़क्त सिंहगडाला एक सहलीचे ठिकाण मानणार्‍या लोकांनाच आवडतो. अर्थातच मी थेट सिंहगडावर जाणार्‍या रस्त्याची निवड केली. अगदी रमत गमत एका हातात सायकल घेऊन मी चालत होतो. मला हव्या त्या ठिकाणी पोहोचायला मला दुपारचे तीन वाजले होते. बरोबर खाण्यासाठी मी डबा आणि पाणी बरोबरच्या पिशवीत आणलेले होते. शिवाय चालून चालून मी पण बराच दमलो होतो. त्यामुळे दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर पहिला मी पोटोबा केला. वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.

+ + +


बसल्या बसल्या एखादा चित्रपट पहिल्यापासून सुरु होतो तशा भूतकाळातील सर्व घटना माझ्या डोळ्यांपुढून तरळू लागल्या. सविताने शाळेत सर्वांसमोर माझा जोकर केल्यानंतर दोन आठवडे माझा अगदी देवदास झाला होता... शेवटी तिला एकदा गाठायचे ठरवून मी तिच्या घरावर लक्ष ठेवताना एक दिवस ती कुठेतरी खरेदीसाठी म्हणून बाहेर पडताना दिसली. तिचा पाठलाग करत घरापासून पुरेशा लांब अंतरावर आल्यावर मी तिला गाठले. तसे सवितावर लक्ष ठेवण्याची आयडिया माझ्या डोक्यात या प्रसंगा नंतरच आली. माणुसकीच्या नात्याने विचार केला तर प्रेमभंगाच्या चुकीसाठी आपण एका व्यक्तीचे आयुष्य संपवणे काही योग्य नव्हे हे मलाही पटत होते. माणुसकी का सूड असे द्वंद्व मनात सतत चालू होते. मनाने सविताला एक संधी देण्याचे ठरवले. प्रेमात माणूस खूप आशावादी असतो हेच खरे. कदाचित तिला आपली चूक उमगेल आणि पुन्हा माझ्या प्रेमाचा स्वीकार करेन अशी मला एक वेडी आशा होती.

पण नाही....शेवटी विश्वासघातामुळे माझ्या मेंदूत धावत असलेल्या गरम रक्ताचाच विजय झाला.

झाल्या प्रकाराचा नाही म्हटले तरी मला खूप रागच आलेला होता. भावनेच्या भरात मी माझ्या प्रेमभंगाचा सूड घेण्याचा प्रण करुन बसलो होतो. तसा मी शांत डोक्याचा, पण पहिले प्रेम हे खूप नाजूक असते. आणि मला ज्या वयात पहिल्या प्रेमाचे हे फ़ळ चाखावयास मिळाले ते वयही तसे कोवळेच होते. सविताला सर्वस्व समजून मी मनाने तिच्यात पूर्णपणे गुंतलो होतो. पहिल्या प्रेमात बसणार्‍या विश्वासघाताचा फ़टका एवढा जबरदस्त होता की मी आतून पार कोलमडूनच गेलो होतो. आज सविताला याचा जाब विचारायचाच असे ठरवून तिला मी गाठले होते.

“सविता असे तू का केलेस? माझ्या प्रेमात काय कमी होती?”
“ए येड्या ...आलास का माझ्यामागे परत?... चल फ़ुट इथून मला त्रास देऊ नकोस.” सविता वैतागून म्हणाली.

“तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना पण मला सहन होत नाही सविता. माझे प्रेम तुला का नको याचे मला तू उत्तर दिलेच पाहिजेस. माझे प्रेम हे काही एकतर्फ़ी नव्हते... ते आपले प्रेम होते...त्यात...”

माझे बोलणे अर्धवट तोडत ती म्हणाली – “ ए भुक्कड ... तुझ्या अजून लक्षात नाही का आले? मुलांना खेळवणे हा माझा छंद आहे... मुलांनी माझ्या मागे लागलेले मला फ़ार आवडते. मग तुला काय वाटते याच्याशी मला काहीही देणं-घेणं नाही. यापुढे परत मला तुझं माकड थोबाड दाखवू नकोस”

मला फ़टकारुन सविता पुढे चालू लागली. एखाद्याला फ़सवणे वेगळे. पण फ़सवून मिजासीने तोंडावर सांगितलेले ऐकणे जास्त क्लेशदायक असते. माझ्या कपाळावरची शीर तडतड उडू लागली. रागाने मनावरचा ताबा जाऊ लागला. माझ्या खर्‍या प्रेमाचा अपमान मला अजिबात सहन झाला नाही.... आधी सविताने माझ्या थोबाडीत मारली होती तेव्हा अविचाराने मी ठरवले होते तिला धडा शिकवण्याचा...पण आता मात्र असह्य झाले होते. माझा आधीचा माणुसकीच्या दुविधेत सापडलेला विचार आता ठाम झाला होता...रागाच्या भरातच मी ओरडलो...

“सविता यापुढे एकदाच तुला माझे हे थोबाड दाखवेन... तेव्हा तुला पश्चाताप होईन ... नक्कीच होईन... पण तेव्हा वेळ गेलेली असेन एवढे लक्षात ठेव...” असे बोलून मी तेथून घरी निघून आलो आणि सूडाच्या तयारीला लागलो.
+ + +


हा प्रसंग आठवून माझे डोळे पाणावले होते पण ह्या आठवणीमुळेच माझी सूड घेण्याची इच्छादेखील तेवढीच प्रबळ झाली. मी पूर्ण तयारीत होतो. साडेपाच वाजता सदाशिवराव पांढरेंची मारुती व्हॅन खाली येताना दिसली. मी त्या महत्त्वाच्या यू टर्न वर उभा राहून त्यांचीच वाट पहात होतो. मी दोघांकडे एक नजर टाकली. दोघंही एकमेकांच्या अंगाशी झटे घेत आणि खिदळत होते. गाडी जरा कमी गतीने येत होती. मी केलेली कृती समजण्यासाठी आधी मी उभा असलेल्या स्थळाचे नीट वर्णन करणे आवश्यक आहे. सिंहगडावरुन खाली येण्यासाठी रस्ता सुरु झाला की चार पाच वळणांनंतर एक मोठा यू टर्न आहे. त्या स्पॉटला गाडी अगदी संथ गतीने न्यावी लागते. वेगात येणारी गाडी खोल दरीत कोसळल्याशिवाय राहिली नसती. कारण यू टर्न आधीचा रस्ता बराच उताराचा होता. तो उतार ब्रेक नसलेल्या गाडीला दरीत भिरकावून देण्याइतकी गती देण्यास पुरेसा होता.

गाडी जवळ आली. शेवटचे वळण घेऊन गाडी उताराला लागताच मी माझ्याकडच्या रिमोटचे बटन दाबले आणि मी गाडीच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यावर पडलेली इलेक्ट्रिक कात्री उचलून मी खिशात टाकली. हो मला कोणताही पुरावा ठेवायचा नव्हता, म्हणून तर ही मेहनत घेतली होती. त्या दोन पापींच्या खुनाने जरी माझे हात बरबटणार असले तरी त्यांच्या संपणार्‍या आयुष्याबरोबर माझ्या आयुष्याची माती करण्यास मी तयार नव्हतो. मला तोपर्यंत गेली पाच वर्षे प्रतिक्षा करत असलेली सविताची किंकाळी ऐकू आली. मी धावत मागे वळून त्या यू टर्न पर्यंत गेलो. गाडी आपटत खाली जात होती आणि अचानक गाडीचा मोठा स्फ़ोट झाला. बहुतेक पेट्रोल ची टाकी एखाद्या दगडावर आपटून फ़ुटली असावी.

आणि हो एक सांगायचे राहिलेच. मी व्हॅनच्या दिशेने जाताना सविताला माझा चेहरा दाखवला होता. मला बघताच प्रचंड घाबरल्याचे भाव तिच्या चेहर्‍यावर मला एकदम स्पष्ट दिसले होते. त्यामुळे तर मला माझा सूड पूर्ण झाल्याचे मोठे समाधान मिळाले होते.

“सिंहगडावरुन मारुती व्हॅन खोल दरीत कोसळून एक नव-विवाहित दांपत्य निधन पावले” अशा आशयाची बातमी दुसर्‍या दिवशी सर्व वर्तमानपत्रांत झळकली होती. रोजच्याप्रमाणेच ही अपघाताची एक बातमी होती. इतरांनी तिला महत्त्व देण्याचे काहीच कारण नव्हते. पण माझ्या दृष्टीने मात्र त्या बातमीचे महत्त्व काही औरच होते. पाच वर्षांच्या खडतर कष्टाचे फ़ळ मला मिळाले होते. बातमी वाचून मोठमोठ्याने मी हसत होतो. पाच वर्षांनंतर प्रथमच मी एवढा मनसोक्त हसलो असेन.
(संपूर्ण)

सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता. मात्र त्यासंबंधित कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.

धन्यवाद,
सागर भंडारे

Sunday, April 19, 2009

शनिवारवाड्याचे रहस्य (संपूर्ण कथा)

शनिवारवाड्याचे रहस्य

-१-
रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो. "वेस्ट्-एन्ड" टॉकीजपासून मी निघालो. मी राहतो रास्ता पेठेत जाताना मला वाटले की थोडे वाकड्या वाटेने घरी जावे. म्हणून मी पॉवर हाऊसमार्गे के.ई.एम. हॉस्पिटलच्या समोरुन जायला निघालो. अचानक माझे लक्ष हॉस्पिटलच्या दरवाज्याकडे गेले. एक व्यक्ती धडपडत माझ्या दिशेने येताना दिसली. मला काहीच कल्पना नव्हती, अचानक तो माणूस माझ्या अंगावर जवळ जवळ कोसळलाच. त्याने लगेच माझ्या हातात एक कागदाचा बोळा कोंबला. प्रकाशात मला दिसले की त्याच्या पाठीत सुरा खुपसलेला होता. मी धोका ओळखला व बाजूच्या भिंतीकडे जाऊन एका झाडामागे लपलो. भीतीने माझी गाळणच उडाली होती. तरी मी धाडस करुन एक दगड उचलला आणि रस्त्यावरचा सार्वजनिक दिवा फोडून टाकला. तेवढ्या भागापुरता तरी अंधार पसरलेला होता. माझ्या हातात कागदाचा बोळा कोंबून धडपडत पुढे पळालेला गृहस्थ आता अंगातील त्राण संपल्यामुळे जमिनीवर निपचित पडलेला होता. तेवढ्यात एक माणूस के.ई.एम्.च्या आतून पळत आला व रस्त्यावर पडलेल्या माणसाची तपासणी करु लागला. पुढे हा काय करतो? हे पाहण्यापूर्वीच मी तेथून पलायन केले. न जाणो आपण याच्या हाती सापडलो तर? मी जवळ जवळ घर येईपर्यंत पळतच होतो. घरापाशी आल्यावरच मी थांबलो. घरी येऊन कपडेही न बदलता मी झोपून गेलो एवढा मी घाबरलो होतो.....

-२-
दुसर्‍या दिवशी मी उशीरा उठलो. रविवार असल्याने आईनेही मला नेहमीप्रमाणे उठवले नाही. उठल्यावर मला जाणवले की काल रात्री कपडे न बदलताच झोपलो होतो. लगेच काल रात्रीचा सर्व प्रसंग मला आठवला. आपसूकच अंगावर शहारा आला. नकळतच माझा हात खिशात गेला. त्या माणसाने माझ्या हातात दिलेला कागदाचा बोळा तसाच अजून खिशात होता. तो मी उलगडला, एका बाजूवर शनिवारवाड्यासंदर्भात काहितरी लिहीले होते व दुसर्‍या बाजूला एका नकाशावर काही चिन्हे होती. नंतर नीट पाहू असे ठरवून मी उठलो. सर्व आवरुन मी शनिवारवाड्यावर जाऊन बसलो. म्हटले ज्या वास्तूचा उल्लेख कागदावर आहे त्याच ठिकाणी जाऊन पाहिलेले बरे असा विचार करुनच मी शनिवारवाडा गाठला होता.

शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच एक माडी आहे, ती माझी आवडती जागा आहे. तिथेच एका कोपर्‍यात बसून तो कागद मी वाचत होतो. त्या कागदाच्या पहिल्या पानावर (बहुतेक त्या माणसाने...) लिहिले होते की, "सन ११७६ मध्ये घडवलेली नटराजाची रत्नजडीत मूर्ती शनिवारवाड्यासमोरील बाजीरावाच्या पुतळ्याखाली आहे." मी बायनॉक्युलर (दूरदर्शी) आणला होता. त्यातून मी बाजीरावाच्या पुतळ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. बाजीरावाची घॉड्यावरची मर्दानी मूर्ती पाहताच अस्सल मराठी माणसाच्या नसा फुगल्याशिवाय रहात नाही. बाजीराव खूप पराक्रमी होता यात काही संशय नाही. पण दुर्दैवाने पहिला बाजीराव हा त्याच्या पराक्रमापेक्षा मस्तानी नावाच्या यवनी नायकिणीच्या प्रेमासाठीच लोकांनी लक्षात ठेवला. शत्रू हातातून सुटू नये म्हणून उभ्या घोड्यावरच हातावर हुरडा भरडून पोट भरुन परत लढाईला कूच करणार्‍या पहिल्या बाजीरावाच्या या कथा केवळ दंतकथा म्हणूनच आता ओळखल्या जातात. बाकी ही मस्तानी होती खूप सुंदर म्हणूनच बाजीरावासारखा रांगडा गडी तिच्यावर भाळला की काय न कळे. पण मस्तानीचेही बाजीरावावर तेवढेच प्रेम होते हेही तितकेच खरे. असो, तर मी माडीवरच्या कोपर्‍यातून बाजीरावाच्या पुतळ्याकडे पाहिले पण तेथे मूर्ती काही दिसली नाही. थोडे डॉके चालवल्यावर कळाले की एवढी मूल्यवान मूर्ती उघड्यावर कोणी ठेवणार नाही. ती बरोबर पुतळ्याच्याच जागी जमिनीखाली असणार. मी पुढे वाचू लागलो -
" ही मूर्ती देशाची मालमत्ता आहे. त्यामुळे मी ही अनमोल मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा विचार करतोय. मूर्तीकडे जाण्याचा नकाशा मागे दिला आहे. मी तर ही मूर्ती काढणे अशक्यच आहे, म्हणून कोणातरी विश्वासू व्यक्तीलाच ही माहिती देण्याचा मनसुबा आहे."
- वीरेन्द्र प्रताप सातव
१२ ऑगस्ट १९९२.



मी विचार करु लागलो, ज्याअर्थी हे पत्र अशा पद्धतीने लिहिले आहे त्याअर्थी खून झालेली व्यक्ती दुसरीच असावी. मी लगेच खाली गेलो व तेथे बसलेल्या विक्रेत्याकडून "सकाळ" व "केसरी" ही पुण्यातील दोन अग्रणी वर्तमानपत्रे विकत घेऊन आलो.मी एवढ्या घाईत घरुन निघालो होतो की न्यूजपेपर वरुन नजर फिरवायची देखील सवड मिळाली नव्हती. पेपर घेऊन मी शनिवारवाड्याच्या माडीवर परत आलो. अगदी पहिल्याच पानावर खुनाची सविस्तर बातमी आलेली होती. मी मन लावून ती सर्व बातमी वाचून काढली. ज्याचा खून झाला होता त्या व्यक्तीचे नाव होते रामदास जाधव. खून करणारा त्याचा भाऊच होता - सीताराम. एका गुप्त आणि प्राचीन मूर्तीची माहिती असलेला नकाशा रामदासकडे होता, म्हणून सीतारामने हा खून केला होता. आपला लहान भाऊ मेला आहे हे कळाल्यावर सीताराम स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. त्यामुळे पोलिसांचे काम संपल्यात जमा होते. पण माझे काम संपले नव्हते, कारण त्या नकाशाचे उत्तरदायित्व आता माझ्याकडे होते. मला ती मूर्ती शोधून काढून सुखरुपपणे पुरातत्त्व खात्याकडे सुपुर्त करायची होती. खूनाचा साक्षिदार म्हणून मी जाणारच नव्हतो, आणि आता तशी गरजही नव्हती. मी घड्याळात पाहिले. नऊ वाजून चाळीस मिनिटे झाली होती. मी खाली उतरलो व शनिवारवाड्याच्या शेवटच्या बाजूस असणार्‍या बंद असलेल्या भुयाराच्या दरवाजाच्या जवळ जाऊन बसलो.

-३-
बरोबर दहा वाजता एक माणूस आला व भुयारात जाणार्‍या लोखंडी दरवाज्याचे कुलुप काढून आत गेला. तसे होणार हे मला माहित होते. कारण कॉलेज मधे असताना कॉलेजचे रटाळ तास बुडवुन आम्ही सगळे मित्र इथे शनिवारवाड्यातच येऊन अभ्यास करायचो. तेव्हा दररोज सकाळी १० वाजता एक माणूस भुयारातील पाण्याची मशीन चालू करायला यायचा. या माहितीचा आज अशा वेळी उपयोग होईन अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तर नेहमीप्रमाणेच आजही तो माणूस आला व भुयाराचे कुलुप उघडून आत गेला. आजूबाजूला पहात मी भुयाराजवळ आलो. कोणी आपल्याकडे पहात नाही याची खात्री करुन मी भुयाराच्या दारातून प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक असे दोन फाटे फुटतात. मशीन सुरु करायला तो माणूस डावीकडे वळाला होता. मला बाजीरावाच्या पुतळ्याखाली जायचे असल्यामुळे मला उजवीकडेच जायचे होते त्याप्रमाणे मी उजवीकडे वळालो. शनिवारवाड्याच्या भुयारांबद्दल एक आख्यायिका आहे. शनिवार वाड्यातून एक भुयार थेट पर्वतीपर्यंत जाते आणि दुसरे भुयार रास्ता पेठेतील रास्तेवाड्यात उघडते. सध्या रास्तेवाड्यात शाळा चालू आहे, तरी शाळेच्या पायर्‍यांपाशीच एक खूप मोठे लोखंडी दार आहे जे कायम कुलुपबंद असते. पर्वतीवरही कायम कुलुपबंद असलेले एक दार आहे. आज या दंतकथेवरील पडदा उघडणार का? असे अनेक विचार मनात येत होते. पुढे खूप अंधार होता. खालच्या बाजूला उतरत जाताना पुढे काय घडणार? हा प्रश्न माझ्या मनात उत्कंठाही निर्माण करत होता आणि भीती देखील.

मी नेहमी एक छोटासा कि-चेन टॉर्च जवळ बाळगायचो, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून. आज तो छोटासा टॉर्च उपयोगाला आला होता. सुरुवातीचे अंतर मी दबकत दबकत टॉर्च न पेटवता चालत होतो कारण मशीन चालू करायला आलेल्या त्या माणसाला टॉर्च चा प्रकाश दिसण्याचा संभव होता. काही अंतर गेल्यावर मला थोड्या ओबडधोबड पायर्‍या पायाला लागल्या. तोल जाईन म्हणून मी टॉर्च पेटवला. पायर्‍या एकूण पाच होत्या. खाली उतरल्यावर एकदम माझ्या पायांना थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. माझे दीड हजार रुपये किंमतीचे बूट पूर्णपणे बुडुन पाणी माझ्या घोट्याला लागले होते. मी टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फेकत पुढे निघालो. अधून मधून नकाशाही पहात होतो. नकाशात असलेल्या खुणा टॉर्चच्या प्रकाशात शोधणं म्हणजे दिव्यच होतं. पहिली मुख्य खूण शनिवारवाड्याच्या दरवाज्यापाशी होती. त्यामुळे मला खूप पुढे जावे लागले. बर्‍याच वेळाने मला असे वाटले की मी आता शनिवारवाड्याच्या प्रासिद्ध पोलादी दरवाज्याखाली आहे. पहिली खूण सूर्याची होती.... " " अशी. टॉर्चच्या प्रकाशात मला ती खूण सापडायला थोडे कष्टच पडले. कारण ती खूण नेमकी माझ्या डोक्यावर होती व मी आजूबाजूला शोधत होतो. पुढे भुयाराने डावीकडे वळण घेतले होते.

पुढची खूण होती चंद्राची.. "". या दोन्ही खुणा शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या आहेत हे मला त्यावेळी आठवले.मी हळू हळू पुढे जात होतो. एकेक खुणा सापडत होत्या. हा नकाशा नसता तर शनिवारवाड्याच्या पोटात असलेल्या भुयारांच्या भुलभुलैय्यात मी कुठे हरवलो असतो कोण जाणे.

-४-
भुयारांतून वळणे घेत घेत मी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. नकाशात एक खूण होती "". ही खूण दगडात अवघड जागी कोरलेली मला सापडली. नकाशातला रस्ता डावीकडे वळायचा संकेत देत होता व प्रत्यक्षात भुयाराचा मार्ग उजवीकडे जात होता. माझे डोके खजिना शोधाच्या साहसकथा वाचून बरेच सुपीक झाले होते त्यामुळे मी लगेच ओळखले की येथे गुप्त द्वार आहे. मी खुणेचे टॉर्चच्या अंधुक प्रकाशात नीट निरीक्षण केले व खुणेतील गोलाकार फुगीर असल्याचे जाणवले. तो फुगीर गोल भाग दाबताच समोरची भिंत आवाज करत मधोमध दुभंगली व माझ्यासाठी डाव्या बाजूने जायचा मार्ग मोकळा झाला. मी आत पहात हळूच प्रवेश केला. एव्हाना पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले होते व माझी आवडती डेनिमची पॅन्टदेखील खराब झाली होती. मी आत प्रवेश केल्याकेल्या एक रिकामा चौथरा माझ्या दृष्टीस पडला. त्यावर मूर्ती नव्हती. आपल्याला यायला उशीर झाला की काय असे वाटून मी निराश झालो. कोणी घेतली असेन याचा विचार करत मी खिन्न होऊन बसलो होतो. मी एकदम माझ्या घड्याळाच्या आवडत्या ट्यूनने भानावर आलो. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्या चौथर्‍याची तपासणी करु लागलो. तपासणी करताना कोणती कळ दाबली गेली न कळे पण चौथर्‍याची फरशी आपोआप बाजूला झाली. त्या चौथर्‍याच्या आत टॉर्चचा प्रकाश न टाकताही ती रत्नजडीत मूर्ती मला लगेच दिसली कारण मूर्तीची सर्व रत्ने खूप चमकत होती. बहुतेक ते सर्व हिरे असावेत असे वाटले, कारण रत्न ओळखण्याइतपत ज्ञान मला नव्हते. फक्त हिरा अंधारात चमकतो एवढेच मला माहित होते. मी माझ्या पाठीवरची सॅक काढली. मी पोहायला चाललो आहे असे आईला सांगून बाहेर पडलो होतो. त्यामुळे सॅक मधे टॉवेलदेखील आणलेला होता मी. तर सोबतच्या टॉवेलात इतिहासातील तो अनमोल रत्नजडीत मूर्तीचा ठेवा काळजीपूर्वक गुंडाळला. मूर्ती सॅकमधे ठेवून मी घड्याळाकडे एक नजर टाकली. माझ्या घड्याळाचे रेडीयमचे काटे अंधारात ११.०५ ही वेळ दाखवत होते. मूर्ती जड होती व त्यात मला पाण्यातून चालायाचे असल्यामुळे थोडा त्रास झाला. पण मी सुखरुपपणे भुयाराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो .

-५-
दाराला परत कुलूप लागलेले होते. मला यायला थोडासा उशीर झाला होता. नेहमीप्रमाणे तो माणूस ११ वाजता कुलूप लावून निघून गेला होता. खिशातून काही मिळते का ते मी पाहू लागलो. हेरगिरीच्या व साहसे करण्याच्या स्वभावापायी मी अनेक वस्तू जमवून ठेवल्या होत्या त्यात अनेक चाव्यापण होत्या. खिशात काही नाही मिळाले पण माझ्या सॅकमधे हा चाव्यांचा जुडगा होता. मी कुलुपाचे निरिक्षण केले. ते छोटेसे व साधेच कुलूप होते. माझ्याकडच्या चाव्यांपैकी एका चावीने ते छोटेसे कुलूप जास्त कष्ट न करता माझ्या सुदैवाने सहजपणे उघडले गेले. बाहेर जाताना मुख्य दरवाजावरील कर्मचारी विचित्र व हेटाळणीच्या नजरेने पहात होता. बरोबर होते त्याचे. गुढग्यापर्यंत पॅन्ट पूर्णपणे भिजलेली, अंगावर असलेली माती, असा माझा अवतार पाहून कोणीही असेच पाहिले असते. तर मी शनिवारवाड्याबाहेर जाताच पहिल्यांदा पब्लिक टेलिफोन बूथ गाठला. सुदैवाने सुटी नाणी होती माझ्याकडे. मी सर्वप्रथम पुण्याच्या महापौरांना फोन केला व थोडक्यात माझा हा उद्योग कळवला आणि पुरातत्त्व खात्याच्या इमारतीत यायची विनंती केली.

मी भांडारकर रस्त्यावरील पुरातत्व खात्याच्या इमारतीत पोहोचेपर्यंत महापौरदेखील आलेले होते. मी येताच महापौरांनी मला जवळ घेऊन माझे खूप कौतुक केले. मूर्तीची माहिती समजताच सर्व वर्तमानपत्रांचे वार्ताहरही आलेले होते. ती रत्नजडीत मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. मी शांतपणे घरी परतलो. घरी येई पर्यंत संध्याकाळ झालेली होती. खूप थकलो असल्याने मी रात्री लवकर झोपलो...

दुसर्‍या दिवशी सकाळी पेपर मध्ये पहिल्या पानावर माझ्या पराक्रमाची सविस्तर हकिकत आलेली होती. अगदी ती रत्नजडीत मूर्ती व महापौर यांच्यासोबत काढलेल्या फोटोसकट. पेपर पाहूनच आईने मला साखरझोपेतून उठवले व म्हणाली- कार्ट्या असे उद्योग करायला उलथला होतास होय? पण गुणाचं ते माझं पोर"... म्हणून आईने मला जवळ घेतलं ...
एका रात्रीत मी सार्‍या पुण्यात फेमस झालो होतो. मला मात्र एका मोठ्या रहस्यावरचा पडदा उघडल्यावर सहजच एक डायलॉग आठवला. माय नेम इस बॉन्ड ... जेम्स बॉन्ड... हा हा...
-सागर

http://sagarkatha.blogspot.com/
(© १९९२ - २००९, सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.या कथेतील कोणताही भाग किंवा कोणतीही कल्पना कोणत्याही कारणासाठी वापरण्यासाठी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे)

सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता. मात्र कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.
धन्यवाद ,
सागर

Friday, February 20, 2009

माझी लघुकथा ????

http://www.misalpav.com/node/6174

एकदा मिसळपाव.कॉम वर एका वाचकाने ६ ओळींची लघुकथा लिहिण्याचे आव्हान दिले...म्हटले चला लिहू, त्यात शब्दांची मर्यादा नव्हती... ... तेव्हा मी म्हटले ६ पेक्षा कमी ओळींची भली मोठी कथा लिहू या... त्या कल्पनेतून साकार झालेली ही कथा

अट अशी होती की शेवटचे वाक्य "हेच मला भारतातील आवडत नाही"

अथवा

"म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे"

यापैकी हवे होते

माझी लघुकथा ????

एकदा एका जंगलातून वाघाच्या पाऊलखुणांच्या मागावर जात असताना अचानक कोकीळेची तान ऐकून इकडे तिकडे पाहताना समोरच्या सरोवरात जलक्रिडा करणार्‍या अप्सरेकडे राजाचे लक्ष जाताच त्याने ठरवले की ह्याच सुंदरीच्या चरणी आपले जीवन अर्पून तिच्याबरोबर केलेल्या सुखाच्या संसाराने आपल्या कुटुंबाचा वृक्ष फुलवता आला तर प्रयत्न करुयात असे ठरवून तो तिच्याजवळ जाऊन त्या सुंदर अप्सरेला म्हणाला की हे सुंदरी तू खूप सुंदर असून माझे चित्त हरपून टाकण्यास कारणीभूत झाल्या कारणाने माझी तुजवर प्रीती जडल्यामुळे तू माझे प्रेम स्विकारावे अशी माझी इच्छा असून माझ्या मुलांची आई जर तू झालीस तर मी तुझा खूप ॠणी तर होईनच पण त्याचबरोबर स्वर्गात मिळणार्‍या सुखापेक्षा जास्त सुख तुला माझ्याकडून मिळेल यासाठी मी अगोदरच एक सांगू इच्छितो की मी या अमरावती नगरीचा तरुण राजा असून मी अविवाहित असल्याकारणाने योग्य वधूच्या शोधात यश न मिळाल्याने जंगलात शिकार करण्यासाठी आलो असताना मी तुला पाहिले आणि तुझ्या सौंदर्याने मज घायाळ करुन तुझा दास होण्याचीच आता माझी इच्छा असल्यामुळे हे सुंदरी तू माझी हो अशी तुला विनंती करण्यासाठी मी येथे आलो आहे , असे सांगून राजा तिच्या आरस्पानी सौंदर्याचे डोळ्यांनी निरिक्षण करत असताना अप्सरेने ओळखले की राजा आपल्या सौंदर्यावर पूर्ण लुब्ध झाला असल्यामुळे आता आपला हेतू साधता येईन असे ठरवून तिने राजाला सांगितले की हे राजन मी तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी आणि तुला संसारसुख देण्यासाठी तत्पर आणि तयार आहे यात तू शंका बाळगावी असे काहीही नसल्याकारणाने माझ्या २ अटी मी सांगत्ये त्यांची पूर्तता झाली की लगेच मी तुझ्याशी लग्न करुन तुझ्या संसाराचा सुखी वृक्ष फुलवेन हे माझे वचन समजून त्यासाठी तू मला सुवर्णपर्वतावरचा सोनेरी पक्षी आणि त्या पक्षाच्या गळ्यातील लाल माणिक आणून दे म्हणजे मी तुझी इच्छा पूर्ण करेन आणि... पुरे पुरे आता मी तुझ्याकडे तेव्हाच येईन जेव्हा माझ्याकडे सुवर्णपर्वतावरचा सोनेरी पक्षी आणि त्याच्या गळ्यातील लाल माणिक घेऊन मी तुझ्या गळ्यात त्याचा हार करुन घालेन तेव्हाच मला तू वरमाला घालशीन याची मला कल्पना असल्याने मी निघतो आता" असे म्हणून राजा सुवर्णपर्वतावर एकटा तर गेलाच पण अप्सरेच्या अटीप्रमाणे दोन्ही गोष्टी खूप पराक्रम करुन घेऊन येत असताना मनात राजा म्हणाला आपण उत्साहाच्या भरात त्या सुंदर अप्सरेचे नावही विचारले नाही तर आता तिच्या आठवणींना काय नाव देऊ असा विचार करतो न करतो तोच ती अप्सरा उडत येताना दिसताच राजाने हर्षोल्ल्हासित होऊन अप्सरेला नाव विचारायचे ठरवले होते तोच अप्सरा म्हणाली राजन चिंता नसावी ही तिलोत्तमा अप्सरा आता फक्त तुमचीच झाली असल्याने आता त्वरीत आपण राज्याकडे प्रस्थान करुन आपल्या प्रजेला ही आनंदाची बातमी देऊन मोठा सण साजरा करुयात.


राजा नगरात येताच प्रजेला नवीन आणि सुंदर राणी तिलोत्तमेच्या रुपाने मिळाल्यावर प्रजाजन खुश झाले होतेच पण राजाही सातव्या अस्मानात होता असे तिलोत्तमेला वाटत असल्याचे राजा मनोमन जाणून असल्याकारणाने त्याने लगेच तिलोत्तमेला पट्टराणी आणि तिच्या पोटी होणार्‍या अपत्याला राज्याचा वारस घोषित केल्याबरोबर प्रजाजन आनंदाने नाचू लागल्याचे पाहून तिलोत्तमा लाजून महालात पळाल्यामुळे राजाचा नाईलाज होऊन तोही आत महालात गेला.


पाच वर्षात राजाला तिलोत्तमेने वचन दिल्याप्रमाणे राजकुमार रत्नसेन आणि राजकुमारी सोनलता ही दोन अपत्ये तर दिलीच पण सोनेरी पक्षी आणि लाल माणिक रत्न यांच्या अनुषंगाने त्यांची नावेही तशीच ठेवली.


आता सोनेरी पक्षी आणि माणिक यांचे रहस्य काय हे जाणून घेण्यात वाचकांना सगळ्यात भारी इंटरेस्ट असल्यकारणाने मी वाचकांना एकच सांगू इच्छितो की असल्या ५ वाक्यांची लघुकथा मी कितीही लांबवू शकलो असतो पण स्वतःचे डोके या कामी खर्च करण्यापेक्षा मला वाचणार्‍या तुम्हा सगळ्यांच्या वेळेची किंमत असल्याकारणाने माझी ५ वाक्यांची कथा इथेच थांबवतो व एकच निदर्शनास आणून देतो की बुद्धिमत्ता आपण कुठेही खर्च करतो.........

हेच मला भारतातील आवडत नाही.


(लघुकथाकार ) सागर (मी एक ओळ वाचवली .... हा हा हा)

Tuesday, April 1, 2008

दिशा : (संपूर्ण कथा)

-x दिशा (कथा) x-
माझ्यासमोरच दादा आणि वहिनी बसले होते. एक मोठाच कूटप्रश्न सोडविण्यास आम्ही तिघे बसलो होतो. खरं तर हा दादा आणि वहिनींचा खाजगी प्रश्न होता; आणि तो सोडविण्यासाठी माझ्यासारख्या अवघ्या विशीतल्या तरूणाची मदत दादाने घ्यावी याचेच मला जरा जास्तच आश्चर्य वाटत होते. कारण वहिनीला घरात येऊन तीन वर्षे झाली होती. आणि या तीन वर्षांत वहिनीला दादापासून अजूनही मूल झालेले नव्हते. याच संदर्भात ते दोघं कालच डॉक्टरांकडे जाऊन आले होते. गेले महिनाभर दादा आणि वहिनी वेगवेगळ्या प्रकारच्या मेडीकल टेस्ट करुन घेत होते. आणि कालच डॉक्टर अवस्थी, जे आमचे फॅमिली डॉक्टर होते.यांच्याकडे ते दोघं रिपोर्ट घेण्यासाठी गेले होते. अर्थात मला या गोष्टीशी फारसं देणं-घेणं नव्हतं. मी माझ्याच उद्योगात मग्न होतो.
"हा डॉक्टरांचा रिपोर्ट" - माझ्याकडे रिपोर्ट सरकवत दादा म्हणाला. मी रिपोर्ट उघडून पाहिला. वेगवेगळ्या चाचण्यांचे शेरे लिहिलेले होते. अर्थात ते डॉक्टरी भाषेत असल्याने माझ्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे होते. फक्त शेवटची ओळ मात्र मला समजली. मलाच काय, कोणालाही त्याचा अर्थ समजला असता. अवघी एकच ओळ. पण त्या ओळीने माझ्या दादाच्या संसारातलं सुख हिरावून घेतलं होतं. ती ओळच अशी होती. - "श्री.ऋषिकेश देशमुख संतती निर्माण करण्यास असमर्थ आहेत." ही ओळ वाचून मी तर सुन्नच झालो. आता कुठे मला दादानं कशाला बोलावलं असावं याची अंधुक अंधुक कल्पना येऊ लागली.
ऋषिदादा माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठा होता. बाबा मल्हारराव देशमुख शहराचे पोलिसप्रमुख होते. ऋषिदादाला पोलिसदलाचा मनापासून तिटकारा होता. त्यामुळे तो शक्य असून पोलिसदलात गेला नाही. बाबा असताना ऋषिदादा मोठ्या पदावर सहजपणे गेला असता. पण दादाला स्वत:च्या पायावर उभं रहायचं होतं. आणि आपल्या मुलाने आपल्या ओळखीवर मोठी नोकरी मिळवावी हे बाबांनाही पसंत नव्हतं. नाहीतर बाबांच्या इतक्या ओळखी आहेत की ऋषिदादाला कुठेही विनाकष्ट नोकरी मिळाली असती. बाबा जरी शहर पोलिसप्रमुख असले तरी ते सत्याच्याच मार्गाने जाणारे होते. त्यामुळे इतर कोणाही पोलिसप्रमुखाच्या घरी दिसली असती तशी श्रीमंतीची लक्षणं आमच्या घरात नव्हती.

बाबांना मिळणार्‍या पगारातून घर व्यवस्थित चालत होतं आणि आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा प्रयत्न बाबांनी कधीच केला नव्हता। त्यापेक्षा बाबांनी सर्वसामान्यांच्या आयुष्याला सुरक्षितता देणं हे आपलं कर्तव्य मानलं होतं। आणि पोलिसप्रमुखाकडून हीच तर अपेक्षा असते सर्वसामान्यांची।

लवकरच दादाने त्याची पात्रता सिद्ध करुन दाखविली. बावीसाव्या वर्षी तो टेल्कोत नोकरीला लागला व २ वर्षात विभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवली व परमनन्ट देखील झाला. लगेच आईने त्याचे लग्न उरकून टाकले. वहिनीला पाहता क्षणीच ती मला खूपच आवडली होती. गोरीपान, गोबरे गाल, हसताना गालाला पडणारी नाजूक कळी, लालचुटूक ओठ, हसताना समोरच्या व्यक्तीवर छाप पाडणार्‍या पांढर्‍याशुभ्र दंतपंक्ती. अंगाने वहिनी बर्‍यापैकी भरलेली होती. पण त्यामुळे ती लट्ठ न वाटता आकर्षकच वाटायची. वहिनीच्या घरी तिला पाहायला मी, आई,बाबा व दादा गेलो होतो. तेव्हाच मी आईला म्हणालो की, वहिनी मला एकदम पसंत आहे म्हणून. यावर आईनं मला दटावलंही होतं - "लग्न तुझ्या दादाचं ठरवायचं आहे तुझं नव्हे.."

"समीर, तुला कसं सांगावं तेच कळत नाहीये. सांगताना मनाला खूप यातना होत आहेत. पण आपल्या घराण्याची, माझी समाजातील अब्रू वाचवण्यासाठीच हे सर्व करणं मला भाग पडत आहे." ऋषि दादा अगदी दीनवाणा चेहरा करुन बोलत होता. "मधुरादेखील या गोष्टीला मोठ्या मनाने तयार झाली आहे. खरंतर कोणतीच स्त्री या गोष्टीला तयार झाली नसती. पण केवळ माझ्या प्रेमाखातर, आपल्या घराण्याची अब्रू वाचावी म्हणून मी तिला तयार केलंय" समीर मला तू एक अपत्य दे. पाहिजे तर मी हात पसरतो तुझ्यापुढे" बोलताना दादा सद्-गदीत झाला होता. मलाही खूप वाईट वाटले की दादावर अशी वेळ यावी. दादा बोलतच होता - "कृत्रिमरित्या गर्भधारणा करवून घेतली असती मी मधुराला. पण दुसर्‍या कोणाचं बीज मी माझ्या घरात वाढू देणार नाही. तुझंही बीज कृत्रिमरित्या मधुरा धारण करु शकली असती. पण मी ठरलो कर्मठ माणूस. या शास्त्रीय पद्धतींवर माझा मुळीच विश्वास नाहीए. कृत्रिमरित्या गर्भधारणा करवून मुलाला जन्म दिला तरी मधुरा आणि मी त्याच्याशी कितपत भावनाशीलतेने वागेन याविषयीही मी साशंकच आहे. अशा मुलाला परत आमच्याबद्दल ओढ , माया राहीन की नाही याबद्दलही शंका घेण्यास जागा आहेत."

जन्मणारं अपत्य नैसर्गिकरित्या पुरुष आणि स्त्रीच्या समागमामुळे जन्म घेणार असेल तरच ते जाणीवा, भावना उपजतच असणारं मूल असतं अशी माझी श्रद्धा आहे. मधुरा चांगली सुदृढ आहे. तूही चांगला कमावत्या शरीराचा आहेस. दोन सुदृढ , सशक्त शरिरांच्या मिलनातून जन्माला येणारं बालक सुदृढ असणारच. मला अपत्य हवंय ते माणूस म्हणून जगणारं हवं आहे, आपल्या वंशाची परंपरा पुढे चालवणारं हवं आहे. दगडी हृदयाचं अपत्य जन्माला घालून मला पश्चात्ताप पावायचं नाहिये." दादानं स्वत:ला आता बरंच सावरलं होतं. शांत पण निश्चयी स्वरात तो बोलत होता - "संयोगापूर्वी तुम्ही दोघांनी माझ्यासमोर शपथ घ्यायला हवी की संयोगानंतरही तुम्ही दोघं एकमेकांत गुंतणार नाहीत म्हणून."

मी लगेच म्हणालो - "दादा कशाला शपथेच्या भानगडीत पडतोस? मूल नसलं तर काय बिघडतं तुझं?"

"समीर, तुझ्या लग्नाला तीन-चार वर्षे झाल्यावरही जर तू बाप झाला नाहीस व लोकांनी तुला षंढ म्हटले तर तुला कसे वाटेल? " दादा विषण्ण मनाने उत्तरला.

"समीर, अरे ह्यांचं म्हणणं बरोबर आहे"" वहिनीदेखील दादाचीच 'री' ओढत म्हणाली-"मलाही आधी असेच वाटत होते की एखादे मूल दत्तक घ्यावे. पण तूच विचार कर. तुझे वडील आपल्या शहराचे पोलिसप्रमुख आहेत. ज्यांनी शहरातल्या गुंडगिरीला आळा घातला व शहरातल्या प्रत्येक नागरिकाला निर्भय आयुष्य जगायची संधी व हिम्मत दिली त्यांचा मुलगा षंढ निघाला हे लोकांना कळाले तर आपली किती छिं-थू होईन. आपल्याला कोणी किंमत देईन का? मलाही अनेक बायका वांझ म्हणून हिणवतात व टोमणे मारत असतात. मी ही जन्मभर निपुत्रिक म्हणूनच का जगावं? आई होण्याचा माझा अधिकार नाहिये का? वरवर दिसायला हे अतिशय साधे-सोपे प्रश्न वाटतात. पण या प्रश्नांच्या अनुभूतीत शिरुन विचार केला तर हे कटू सत्य पचवणं किती जड आहे याची लगेच जाणीव होते. तूच विचार कर, ही वास्तवता तू सहन करु शकला असतास का?

वहिनीच्या ह्या सडेतोड स्पष्टीकरणाने माझा नकार तर सप्त पाताळांखाली गाडला गेला होता. खरंच मी ही वास्तवता सहन करु शकलो असतो का? तर 'नाही' हेच उत्तर मला मिळत होते. तसा मी शांत प्रवृत्तीचा पण मला कोणी षंढ म्हणालेलं काही मी ऐकून घेतलं नसतं.

"संयोगानंतर आम्ही एकमेकांत गुंतणार नाही" ही शपथ घेताना मला कन्नड साहित्यिक 'एस.एल. भैरप्पा' यांच्या 'पर्व' या महाभारतावर आधारीत कादंबरीतील प्रसंग आठवला. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पांडुराजा 'उत्तर-कुरु' या प्रदेशातील देव गणाचा धर्माधिकारी याला कुंतीशी नियोग करण्याची विनंती करतो. त्यावेळी हीच शपथ पांडुराजाने धर्माधिकारी व कुंती यांच्याकडून घेतली होती.

आई-बाबा परवाच दोन महिन्यांच्या 'दक्षिण-भारत'च्या यात्रेला गेले होते. त्यामुळे आमचं तीन खोल्यांचं घर बरंच मोठं भासत होतं. मी आणि वहिनी त्या रात्री बेडरुममध्ये गेलो. दादा हॉलमधे झोपणार होता. खोलीत शिरताना आमच्या दोघांची मने कर्तव्याच्या भावनेने भारलेली होती. पण जसजसं वहिनीचं सौंदर्य माझ्यापुढे उघडं पडलं व माझ्या सहवासात शरीरसुखाचा आनंद वहिनीला मिळू लागला तसतशी आमच्या दोघांच्या मनातली कर्तव्यपालनाची पवित्र भावना नष्ट झाली. पहाटेपर्यंत मधुरा [होय मधुराच म्हणणे योग्य. कारण त्या काळरात्रीने माझ्यात आणि मधुरात असलेलं दीर-भावजय हे नातंच मिटवून टाकलं] माझ्याशी लगट करत होती. शेवटी थकल्यामुळे पहाटे कधीतरी आम्ही दोघेही निद्रादेवीच्या अधीन झालो.

सकाळी आम्ही बाहेर येताना दादा आम्हा दोघांकडे संशयाने पहात होता. पण बाहेर येतानाच दादापुढे कसं वागायचं हे मी आणि मधुराने ठरवलं होतं. त्यामुळे लगेच त्याच्या चेहर्‍यावरचा संशय दूर झाला. "समीर, माझ्या भावा.... मला तू केवढ्या मोठ्या मानहानीपासून वाचवलं आहेस याची तुला कल्पना नाही. मी जन्मभर तुझा ऋणी राहीन." दादाचे हे शब्द ऐकून मी निर्विकारपणे माझं फुटबॉलचं किट उचललं आणि ग्राउंडवर खेळायला गेलो...

सुमारे दोन महिन्यांनंतरः
आई-बाबा कालच परत आले होते. या दोन महिन्यांत दादा घरात नसताना मधुरा कायमच माझ्या सहवासात असायची. त्यामुळे आम्ही हवे ते करु शकत होतो, वाटेल तसे बोलू शकत होतो. पण काल आई-बाबा आल्यापासून आम्हाला एकमेकांकडे बघायचीदेखील चोरी झाली होती. महत्प्रयासाने आम्ही एकमेकांना सावरत होतो. माझा सहवास मिळवण्यासाठी मधुराची चाललेली तडफड पाहून मला पुन्हा एकदा वाचत असलेल्या 'पर्व' कादंबरीतील कुंती आणि माद्री यांची आठवण आली. "दोघीही सौंदर्यवती. पण नियोग करताना त्यांच्या मनात शरीरसुखाची प्राप्ती हे ध्येय असेन का अपत्यप्राप्ती? बराच वेळ विचार करुनही हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. शेवटी मीच कंटाळून तो विचार बाजूला सारला.

सुमारे सात महिन्यांनंतरः
घरात जरी मी मधुराला वहिनी म्हणत असलो तरी आम्ही जेव्हा एकांतात भेटू तेव्हा मी तिला मधुराच म्हणत असे. त्या रात्रीचे की कोणत्या दिवसाचे माहित नाही पण माझे व मधुराचे मिलन सफल झाले होते. मधुरा आता कोणत्याही क्षणी बाळंतीण होणार होती. गर्भाचे नऊ महिने भरत आले होते. आई-बाबा देखील वंशाला दिवा मिळणार म्हणून खूप आनंदात होते. मी मात्र रोज संध्याकाळी शिवमंदीरात 'आनंदस्वामीं'चे प्रवचन ऐकायला जाऊ लागलो होतो. आनंदस्वामी तीन महिने रोज सायंकाळी प्रवचन करणार होते. कालच पहिले प्रवचन मी ऐकले होते. त्यांच्या पहिल्याच प्रवचनाने मला पूर्ण भारुन टाकले होते. स्वामीजींची समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुरस आणि श्रवणीय होती. पहिल्याच प्रवचनाच्या वेळी मी ठरवले की आनंदस्वामीजींची सर्व प्रवचने ऐकायची

"स्वतःचा उद्धार करायचा असेल तर संसारचक्राच्या मोहात न अडकता कर्तव्यबुद्धीने वागून योगमार्ग अनुसरला पाहिजे. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात सात चक्रे असतात. कुंडलीनी शक्ती प्रथम जागृत करायची असते. त्यानंतर प्राणाचा कुंडलीनीत वा ब्रह्मरंध्रांत प्रवेश करवून तेथे तो स्थिर करावयाचा असतो. त्यानंतर एकामागोमाग एक अशी सात चक्रे भेदण्यात जो यशस्वी होतो तो ब्रह्म जाणतो. व जो ब्रह्म जाणतो तो संसारमायेच्या चक्रातून मुक्त होऊन चिदानंदाचा अनुभव घेतो" असा साधारणतः आनंदस्वामींच्या प्रवचनाचा सारांश होता.

अजून दोन महिन्यांनंतरः
मधुराला मुलगा झाला होता. त्या दिवशी मी खूपच आनंदीत झालो होतो. माझा स्वतःचा अंश आपले इवलेसे हात-पाय हालवत माझ्याकडे सारखा बघतोय याचंच मला तेव्हा खूप अप्रूप वाटायचं. वाटायचं की हेच ते संसारसुख ज्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुष लग्न करतात. पण आता मला तसलं काहीच जाणवत नाही. आनंदस्वामींच्या प्रवचनांचा परिणाम होता हा. खरंतर हिमालयातल्या योग्यांविषयी मी बरंच काही वाचलं होतं. त्यातच 'जी.के. प्रधान' यांची 'साद देती हिमशिखरे' व कन्नड साहित्यिक 'एस्.एल. भैरप्पा' यांची 'निराकरण' ही दोन पुस्तके माझ्या वाचनात आली होती. तेव्हा तर मला घर-दार सोडून हिमालयात जावं असे खूप वाटत होते. पण मी गेलो नाही. एक तर मी गेलो तर आपल्यामागे आई-बाबा, दादा-मधुरा यांचे काय होईल याची चिंता होती. शिवाय मधुराच्या पोटी जन्म घेणार्‍या माझ्या मुलाला बघायचीही इच्छा होतीच. हे सर्व आठवल्यावर मला आनंदस्वामींच्या एका प्रवचनाची आठवण झाली. आनंदस्वामी म्हणाले होते-"माया हे ब्रह्माचेच एक रुप आहे. ज्याला ब्रह्म जाणून घ्यायचे आहे त्याने मायेचा त्याग केला पाहिजे. या जगात मी नसलो तर इतरांचे काय होईल हा विचार मनात येणे म्हणजे मायाजालात आपणहून अडकणे. म्हणूनच मी सांगतो लोकहो योगसाधना करा. योगमार्गच तुम्हाला मायेपासून दूर नेण्यास मदत करेन.

गेले दोन महिने आनंदस्वामींची प्रवचने ऐकून मी माझ्या शंका आनंदस्वामींपुढे बोलून दाखवत असे. प्रवचन चालू असताना सर्व लोकांसमोर स्वामीजींना प्रश्न विचारायला मला संकोच वाटत होता. म्हणून मी प्रवचनानंतर आनंदस्वामींना माझ्या शंका विचारत असे. कारण मला अनुभवच तसा आला होता. पहिल्याच प्रवचनाच्या वेळी मी स्वामीजींना विचारले होते - " अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे नक्की काय करायचे स्वामीजी? " मी प्रश्न विचारला तेव्हा सगळे लोक माझ्याकडे बघायला लागले. काय वेडगळ प्रश्न विचारतोय अशा थाटात सगळे माझ्याकडे बघत होते. एक तरुण मुलगा अध्यात्म या विषयावर प्रश्न विचारतोय हे लोकांना पटतच नव्हते. मला एकदम संकोचल्यासारखं झालं होतं. माझी ही अवस्था ओळखूनच जणू स्वामीजी म्हणाले होते - " वत्सा, प्रवचनानंतर मला भेट. तुझ्या शंकेचं मी निरसन करुन देईन." आणि त्या अनुभवापासून मात्र मी शहाणा झालो. प्रवचन चालू असताना मी स्वामीजींना कधीच प्रश्न विचारले नाहीत.

प्रवचनानंतर मी त्यांना माझ्या शंका बोलून दाखवायचो. आनंदस्वामीदेखील माझ्या शंकांना न थकता प्रसन्न वदनाने उत्तरे देत असत. माझ्या या शंकांचा वा प्रश्नांचा भडीमार मी जो स्वामीजींवर करायचो त्यामुळे मी व आनंदस्वामी खूप जवळ आलो होतो. आनंदस्वामींच्या सहवासात माझं मन विरक्त होत चाललं होतं. ते सांगत असलेल्या प्रत्येक योगसाधना अगदी श्रद्धेने आणि मनापासून करीत होतो. ते नेहमी म्हणत, "अरे योगसाधना ही फक्त पहिली पायरी आहे. बरेच जण योग आला म्हणजे अखिल सृष्टीचे ज्ञान झाले असे मानतात, ते काही बरोबर नाही. खरा कस तर पुढेच लागतो." मन स्वस्थ करण्यासाठीच आनंदस्वामी माझ्याकडून योगसाधना करवून घेत होते. पण आज सकाळीच पाहिलेल्या दृश्याने तर माझ मन खूप अस्वस्थ झालं होतं. जिला मी आपली म्हणत होतो, जिच्या पोटी माझा अंश जन्माला आला होता, ती मधुरा मला दुसर्‍या पुरुषाबरोबर दिसली होती.

सकाळी ग्राऊंडवरुन फुटबॉल खेळून घरी येत असताना नऊच्या सुमारास मधुरा मला जाताना दिसली. मला वाटले भाजी आणायला चालली असेन. पण कोणी आपल्याला बघत तर नाहीए ना अशी सर्वत्र नजर फेकत ती जात होती. त्यामुळेच मला संशय आला व मी मधुराच्या नकळत तिच्या मागे गेलो. मी व मधुरा नेहमी ज्या लॉजमध्ये जायचो त्याच लॉजमध्ये ती गेली. ती २० नंबरच्या रुम मधे गेल्याचे मी पाहिले होते. ते हॉटेल बरेच जुनेपुराणे होते त्यामुळे तिथे लोकांचा वावर तितकासा नसायचा. मी सहज खिडकीच्या फटीतून जे दृश्य पाहिले त्यावर माझा विश्वासच बसेना. मधुरा एका तरूणाच्या मिठीत पूर्णपणे विवस्त्रावस्थेत होती. त्याच क्षणी माझी कानशिलं गरम झाली व रागाने माझा ताबा घेतला. त्याच क्षणी मी तेथून निघालो व तडक आनंदस्वामींच्याकडे आलो.

"काय रे अजूनही इच्छा आहे का मदुराशी संबंध ठेवायची?" मी पोहोचताच आनंदस्वामींनी प्रश्नाचा बाँबच टाकला. मी एकदम सटपटलोच. कारण माझं हे मधुरा प्रकरण मी आनंदस्वामींनाच काय पण कोणालाच सांगितलं नव्हतं. आनंदस्वामी हे योगी होते. त्यांचा आरोप नाकारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. पण तरी मी म्हणालो-"स्वामीजी तुम्हाला हे कसं समजलं?" त्यावर आनंदस्वामी हसत उत्तरले-"लेका, मी हिमालयात आलेले अनुभव, केलेल्या साधना, प्राप्त झालेल्या सिद्धींविषयी केलेलं विवेचन सारं काही विसरलास का?" मला एकदम शरमल्यासारखं झालं. मधुराने केलेला विश्वासघात मला अस्वस्थ करत होता. शिवाय घरात आई-बाबांबरोबरही शाब्दीक चकमकी अनेक घडत होत्या. आई तर मला माझ्या बाळाला हातही लावू देत नव्हती.

माझं मन पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं. तसंच ते विरक्तही झालं होतं. आता कसलीच आसक्ती उरली नव्हती. संपूर्ण आयुष्य योगाभ्यासात समर्पित करुन टाकावं अशी आंतरिक इच्छा आता मनात निर्माण होऊ लागली होती. तेव्हाच मी घर सोडून आनंदस्वामींच्या बरोबर जायचा ठाम निश्चय केला. थोडा वेळ मी स्वामीजींपाशी बसून घरी जायला निघालो...

सुमारे एक महिन्यानंतरः
कालच मी हे शहर सोडलं. आनंदस्वामींबरोबर. घरात माझ्या लिहिण्याच्या टेबलावर फक्त एका ओळीत चिठ्ठी ठेवली होती. करायचं काय या शहरात राहून? आनंदस्वामींनी सांगितल्याप्रमाणे मला जर योगमार्ग स्वीकारायचा असेल तर मायेतून मुक्त होणं आवश्यक होतं. मायेतून मुक्त होण्यासाठी मुख्य कारणांनाच दूर लोटायचं होतं. त्याप्रमाणेच मी हे घर सोडलं. मी घर सोडणार आहे हे फक्त मी आनंदस्वामींनाच सांगितलं होतं - एक महिन्यापूर्वीच. योगमार्गात गुरु हा अत्यावश्यकच असतो. कारण योगमार्गातील धोक्याच्या जागा दाखवून देणारा, सिद्धी प्राप्त झाल्यामुळे मनात अहंकार निर्माण होऊन भरकटलेल्या साधकाला परत मार्गावर आणणारा फक्त 'गुरु'च असतो. त्यामुळेच मी आनंदस्वामींचे शिष्यत्व पत्करले होते. आनंदस्वामीदेखील मी त्यांचा शिष्य झाल्यामुळे प्रफुल्लित दिसत होते.

संसारात रहायचं कशासाठी? तर लग्न करायचे... आपला वंश वाढावा या आशेपोटी चार-दोन जीवांच्या जन्मासाठी कारणीभूत व्हायचे. दु:खाच्या वाटेवर सुखाचे कण शोधत कशीबशी जीवन-नौका ढकलायची. अंतिम सत्यापर्यंत जर मला पोहोचायचे असेल तर लग्नाच्या बंधनात अडकणे हितावह नव्हते. राहिली वंशाला दिवा देण्याची बात. तर मधुराच्या पोटी माझा अंश जन्माला आलाच आहे. वंशाला दिवा देण्यासाठी मला लग्नाच्या बंधनात अडकण्याची आवश्यकता नव्हती. माझा मार्ग आता मोकळा होता.

आनंदस्वामींबरोबर मी हिमालयात जाणार होतो. तिथे आनंदस्वामी माझ्यासाठी योगमार्गाचे प्रवेशद्वार खुले करणार होते. मला माझ्या जीवनाची योग्य दिशा सापडली होती. इतके दिवस अंधारात चाचपडत होतो. पण आता मात्र सारं काही माझ्या नजरेसमोर स्पष्ट झालं होतं. हे जीवन कशासाठी आहे? कशाला जगायचे? प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश काय? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे आता मिळणार होती...मला दिशा सापडली होती आणि आनंदस्वामी मला योग्य मार्गाने अंतिम सत्यापर्यंत पोहोविण्यासाठी मदत करणार होते.
मी आनंदस्वामींबरोबर जाताना पूर्णपणे आनंदी व समाधानी होतो. आजूबाजूचा निसर्गदेखील वातावरण प्रसन्न करण्यात हातभार लावत होता आणि माझी पावले मात्र ठामपणे पडत होती.... हिमालयाच्या दिशेने.... अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी...
- सागर भंडारे © २०००-२००८ , सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत

Monday, January 14, 2008

स्पर्श - सागर

— प्रारंभ —
रात्रीची दोन वाजताची वेळ होती.
मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात एका खाजगी रुममध्ये शलाका बेडवर पडली होती.
डोळे उघडे होते पण त्यांत कोणतीही संवेदना जाणवत नव्हती.
तिच्या डोक्याभोवती पूर्ण बँडेज गुंडाळले होते. अजूनही रक्ताने माखलेली तिची आवडती आंबा कलरची साडी तिच्या अंगावर होती. आजूबाजुला चार नर्सेस आणि दोन शिकाऊ डॉक्टर उभे होते. डॉक्टर अभिजीत नुकतेच सहका-यांना तिची काळजीपूर्वक देखभाल करण्यासाठी सांगून गेले होते.
ते स्वत: शलाकाचे मेंदूचे C.T. Scan चे रिपोर्टस् बघायला चालले होते.

डॉक्टर अभिजीत यांना शलाकावरचे उपचार आणि आईंची समजूत घालणे हे दोन्ही बघावे लागत होते. आदित्यच्या आईच्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वहात होत्या. गेल्या तीन तासांत ती सतत रडतच होती.
डॉक्टर अभिजीत शलाकाचे रिपोर्टस् बघायला जाताच आईचे विचारचक्र सुरु झाले.

आदित्यची आई,सावित्रीबाई, अतिशय देवभोळी, शकुन-अपशकून आणि पायगुण मानणारी होती. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सांगड तिला देवाशी, शकुनाशी किंवा त्या व्यक्तिच्या पायगुणाशी घालण्याची सवयच होती.
शलाका घरातून निघतानाच आईला समोरच्या जोशी काकूंच्या घरचे मांजर दिसले होते.
आई म्हणाल्यापण होत्या - "अगं घरातून बाहेर जाताना मांजर दिसणं चांगलं नसतं. तू नको जाऊस."
"आई मी गेले नाही तर ह्यांची खबरबात कशी मिळेल. मला जायलाच हवं. रोजच तर ते मांजर दिसते." असं म्हणून शलाका आदिची कार घेऊन वेगाने एअरपोर्टकडे निघाली होती.

सावित्रीबाई शलाकाशेजारीच बसल्या होत्या. बघता बघता सावित्रीबाईंच्या अश्रूनी ओल्या झालेल्या डोळ्यांसमोर गेल्या चार तासांतील घडामोडी धूसरपणे दृश्यरुप घेऊ लागल्या.


—१ —
आज सकाळपासूनच शलाका भलतीच खुशीत होती.
अगदी पहाटे पाचलाच ती उठली होती. उठल्या उठल्या स्नान करुन लगेच देवपूजेला देखील बसली होती.
देवाची पूजा करून होताच मग ती आपल्या सासूच्या,सावित्रीबाईंच्या, सेवेस लागली.
नेहमी प्रमाणे तिने त्यांना सकाळचा नाश्ता दिला. आज सासूबाईंच्या आवडीचे कांदापोहे शलाकाने केले होते.
शलाकाच्या हातात कांदापोहे असलेली डिश् बघूनच सावित्रीबाई म्हणाल्या-
"आज आदि येणार आहे म्हणून माझी चांगलीच चंगळ होणार असे दिसतेय."
आदित्य आज अमेरिकेहून दुबईमार्गे येणार होता.
"हे हो काय आई?" शलाका लटक्या रागाने म्हणाली - "दुपारच्या जेवणाला मग तुम्हाला कांदाभजी देणार नाही मी"
नाहीतरी अभिजीत काकांनी तुम्हाला तळलेले पदार्थ खायला मनाई केली आहेच."

सावित्रीबाई मनाने चांगल्या होत्या. तशीच त्यांची सून शलाका पण स्वभावाने खूप चांगली होती. मुख्य म्हणजे ती देव मानणारी आणि मोठ्यांना मान देणारी होती. छोट्या छोट्या गोष्टींवरुन आजकालच्या मुलींसारखी सासूशी भांडणारी अजिबात नव्हती.

-- थोडेसे मागे --
शलाकाचे वडील दामोदरपंत सप्तर्षि एकदम कर्मठ ब्राह्मण होते. समाजात त्यांना संस्कृतचे प्रकांड पंडीत आणि वेदांचे गाढे अभ्यासक म्हणून खूप मान होता. घरातदेखील अतिशय सुसंस्कृत वातावरण होते.पुण्यातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकीक होता.
दामोदरपंत जरी धार्मिक असले तरी त्यांना विज्ञानाची कास होती, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या संस्कारांबरोबरच विज्ञानाचा दृष्टीकोणदेखील दिला होता. त्याचाच परिपाक म्हणून त्यांची दोन मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत वैज्ञानिक म्हणून नावलौकीक मिळवते झाले होते. शलाका ही सर्वात धाकटी आणि सर्वात हुशार मुलगी. तिने स्वत:च संगणकतज्ञ व्हायचं ठरवलं होतं.
जेव्हा पुणे विद्यापीठांतील हुशार स्नातकांना एका नावाजलेल्या कंपनीने मुलाखती घेऊन निवडायचे ठरवले तेव्हा शलाकाची त्यांत निवड होणे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे तिची निवड झाली देखील.खरेतर शलाकाने एक गंमत म्हणून ही मुलाखत दिली होती फक्त स्वत:चे मूल्यमापन करण्यासाठी.कंपनीचे ऑफिस नवी मुंबईला असल्याने पुणे सोडून तिकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. पप्पांची ती खूप लाडकी असल्याने पप्पा तिला परवानगी देणार नाही याची तिला खात्री होती.
एक दिवस ती 'जावा'च्या क्लासवरून घरी येताच दामोदरपंतांनी तिला बोलावले.
"अगं शलू, हातपाय धुवून आधी इकडे ये बघू"
"आलेच. दोन मिनिटांत येते" म्हणून खरोखरंच ती दोन मिनिटांत आली.
"अगं तुझं पत्र आलंय. हे काय आहे? कंपनीचं नेमणूक पत्र आलंय. "
"ओह्, ते होय? अहो पप्पा मी सहज गंमत म्हणून मुलाखत दिली होती. त्यामुळे तुम्हालाही सांगायचे विसरले."
"अगं पण कंपनी खूप चांगली आहे. आणि ही संधी तू गमवू नयेस असे मला वाटते"
दामोदरपंतांच्या तोंडून परवानगीचे हे शब्द ऎकताच तिचा एक क्षण विश्वासच बसेना.
"पप्पाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" म्हणत तिने एकदम दामोदरपंतांना मिठी मारली.
मनातून शलाकाला ही संधी गमावू नये असेच वाटत होते. पण दामोदरपंतांच्या आकस्मिकपणे मिळालेल्या परवानगीने सगळे चित्रच बदलून गेले होते. दामोदरपंतांनी शलाकाची रहाण्याची व्यवस्था नवी-मुंबईलाच त्यांच्या बहीणीकडे केली होती.
आणि बघता बघता शलाकाचे करियर सुरु झाले.

दोन वर्षांत शलाकाने कंपनीत आपले स्थान पक्के तर केले होतेच. पण तिच्या मनमोकळ्या पण घरंदाज स्वभावाने सर्व थरांवरच्या लोकांशी अतिशय चांगले संबंध तिने निर्माण केले होते.अशातच गेल्या एक वर्षापासून कंपनीतील एका इंजिनिअरने, आदित्यने, तिचे लक्ष (खरे तर चित्त)वेधून घेतले होते. आदित्य हा देखील अगदी मनमोकळ्या स्वभावाचा आणि सर्वांना स्वत:चे कामदेखील संभाळून सतत मदत करण्यास तत्पर रहात असे. एक वर्षापूर्वी जेव्हा आदित्यला सर्वोत्कृष्ट नवीन कर्मचा-याचे पारितोषिक जाहीर झाले तेव्हाच शलाकाला त्याचे मनमोकळे आणि प्रसन्न व्यक्तीमत्त्व आवडले होते. पण तिचा त्याच्याशी बोलण्याचा धीर होत नव्हता. तिला असे वाटायचे की त्याला देखील तिच्यात रस आहे. पण हे केवळ वाटणेच असेल तर? असा विचार करुन ती गप्प बसली होती. दरवर्षीप्रमाणे आज पुन्हा कंपनीत समारंभ होता. आणि सर्वोत्कृष्ट कर्मचा-याचे पारितोषिक आदित्यलाच मिळाले. मॅनेजमेंटने त्याला प्रमोशन देऊन शलाकाच्या प्रोजेक्टवर आता रिक्रूट केले होते.
खरे तर शलाकाला मनापासून आनंद झाला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत दोघांची घनिष्ठ मैत्री झाली.
हळू हळू बाहेर भेटणे, फिरायला जाणे या गोष्टी होऊ लागल्या. एवढेच नव्हे तर तो तिला घरीदेखील सोडत असे.
लवकरच शलाकाच्या आत्याच्या कुटुंबालादेखील आदित्यने आपल्या मनमोकळ्या स्वभावाने जिंकले.
आणि ऎके दिवशी आदित्यने तिला गेटवे ऑफ इंडियाला फिरायला नेले. तेथे त्याने तिच्यावरचे प्रेम व्यक्त करुन तिला लग्नासाठी मागणी घातली ती पण एकदम स्पष्ट शब्दात. मला तुला काही सांगायचे आहे वगैरे फाटे न फोडता.
"शलाका! माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?"
एक क्षण शलाका बावरुनच गेली. मग लगेच तिच्या गालावर रक्तिमा पसरला. त्यातच तिचा होकार सामावलेला होता.
नंतर बराच वेळ दोघे बोलत होते.
शलाका म्हणाली - "तू केव्हापासून माझ्या मनात भरला होतास. पण तुझ्याशी बोलायची पण भिती वाटत होती."
हसून आदि म्हणाला - "तुला काय वाटतं मी तुझ्या प्रोजेक्टवर कसा रिक्रूट झालो?"
"मी डायरेक्ट आपल्या प्रोजेक्ट मॅनेजरला सांगितले की मला या प्रोजेक्टवर काम करायचे आहे म्हणून.
मी त्यांचा आवडता असल्याने त्यांनीही लगेच सूत्रे हलवून मला इकडे शिफ्ट केले होते."
यावर शलाका थोडीशी लटक्या रागाने म्हणाली- "म्हणजे सगळे तू ठरवून केले होतेस तर"
"आता रागवू नका बाईसाहेब. तुमच्यासाठीच हे सर्व मी केले होते."
आदिने शलाकाला त्याची सगळी माहिती सांगीतली.
आनंदराव पाटील म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व होतं. व्यवसायाने डॉक्टर असलेला हा माणूस कुस्तीचा शौकीन होता.
मूळचे कोल्हापूरचे असल्याने कुस्तीचा वारसा त्यांना उपजतच मिळाला होता. स्वत: आनंदरावांनी त्यांच्या तरूणपणी कोल्हापूरच्या मी मी म्हणणा-या मल्लांना अस्मान दाखवले होते. अर्थातच तो त्यांचा शौक होता, ध्येय नव्हते.
इतिहासाची अतिशय आवड असणा-या आनंदरावांनी घरातील एका खोलीत इतिहासाच्या पुस्तकांचे एक छोटेसे ग्रंथालय पण केले होते. ते पण कमी होते की काय म्हणून त्यांना भटकंती करायची खूप हौस होती. स्वारी दोन तीन महीन्यांतून एकदा तरी भटकंतीसाठी जात असे. अशातच आनंदरावांची बदली मुंबईला झाली. आणि गेले १५ वर्षांपासून ते तिथेच स्थायिक झाले होते.
अशाच एका भटकंतीच्या नादात आनंदरावांचे एका गडावरून खोल दरीत पडून अपघाती निधन झाले होते.
आनंदरावांच्या निधनानंतर मोठे दोन्ही भाऊ बायकांच्या मुठीत असल्याने त्यांनी वेगळी बि-हाडे थाटून आईची सगळी जबाबदारी लहानग्या आदित्यवर टाकली होती. तेव्हापासून आदित्यचाच सावित्रीबाईंना आधार होता.
आदित्य देखील हुशार होता. वयाच्या पंचविसाव्या वर्षीच एका आंतरराष्ट्रीय संगणकप्रणालीच्या कंपनीत नोकरीला लागला होता. अर्थात त्याने खूप कष्ट केले होते. रात्रंदिवस काम आणि अभ्यास दोन्ही केले होते.

हळू हळू एकमेकांच्या सहवासात धुंद होऊन कधी खंडाळा तर कधी एलेफंटा केव्हज् या सफरी होऊ लागल्या.
तरीही दोघे घरंदाज असल्याने त्यांनी प्रेम करताना कुठेही मर्यादा ओलांडली नव्हती.
अशा रितीने प्रेम-प्रकरण फुलल्यानंतर काही महिने मजेत गेले.
नंतर शलाकाच्या आईने शलाकासाठी स्थळ बघण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतल्यावर आपल्या प्रेमवीरांना जाग आली.
शलाकाने आधी आईला एवढी काय घाई आहे असे सांगून टाळायचा प्रयत्न केला होता. पप्पांनादेखील पुढे केले होते.
पण तिच्या आईने या बाबतीत तरी मी तुमचे काही ऎकणार नाही असे सुनावून तो मार्ग बंद केला होता.
त्यामुळे आदि आणि शलाकाला याबाबतीत काय करावे हे सुचेनासे झाले. एक दिवस शलाकाला हिरमुसलेली बघून आत्याने तिला विचारले - "काय गं, काय झालं"
शलाकाच्या आत्याला एव्हाना त्या दोघांचे प्रेमप्रकरण माहीत होते.
आदिचे त्यांच्या घरी येणे-जाणे तर होतेच पण काकू मला भूक लागली आहे काहीतरी खायला द्या असे हक्काने सांगू शकेल असे घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. आणि तिचा त्यांना पाठींबादेखील होता.
शलाकाने सगळी हकीगत आत्याला सांगितली.
आत्या म्हणाली - "एवढंच ना? तू अजिबात चिंता करु नकोस.शांतपणे जाऊन झोप बघू.मी बघते काय करायचे ते"
आत्याने मदत केल्याने अनपेक्षितपणे हा मोठा तिढा सहजपणे सुटला होता.
आत्याचे म्हणणे डावलायची हिम्मत दामोदरपंतांच्या घरात कोणातच नव्हती एवढा तिचा दरारा होता.
पण स्वत:च्या मुलीचाच प्रश्न असल्याने सुरुवातीला दामोदरपंतांनी तिच्याशी वाददेखील घातला.
आत्याने त्यांना नीट समजावून सांगितले-"मुलाला मी चांगले ओळखते. आपली शलाका अगदी सुखी राहील त्याच्याबरोबर"
काही झाले तर मला जबाबदार धरा. तुम्हाला हवं तर आधी तुम्ही मुलाला बघा. मगच तुमचे मत सांगा"
दामोदरपंत आपल्या बहिणीला चांगले ओळखून होते.
आपली बहीण एवढ्या खात्रीने हमी देत आहे म्हणजे मुलगा नक्कीच चांगला असणार. भेटून तर बघू असे म्हणून सुरुवात झाली
आणि लवकरच सर्वसंमतीने आदि-शलाकाचे लग्न देखील झाले।

- पुन्हा वर्तमानात...
आदित्यचे लग्न होताच अवघ्या चार महीन्यांत तिने आपल्या वर्तनाने सासूचा पूर्ण विश्वास जिंकला होता.
आता तर तिच्याशिवाय त्यांचे पानदेखील हलत नव्हते.
तेव्हा सावित्रीबाई हसू लागल्या. "तू कधीही असे करणार नाहीस हे मला माहीत आहे.
तूच तर माझी काळजी घेते आहेस.पोटच्या २ मुलांनी मला वा-यावर सोडले तेव्हापासून आदिच माझं सगळं बघायचा.आणि आता तर तू देखील मला काही कष्ट करु देत नाहिस की काही कमी पडू देत नाहीस."
त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं. आनंदराव जेव्हा अचानकपणे अपघातात गेले तेव्हापासून धाकटा असूनही आदिच आईची सगळी काळजी घ्यायचा.
जेव्हा आदित्यने आईला सांगितले "आई माझे एका मुलीवर प्रेम आहे. आणि तिच्याशी मला लग्न करायचे आहे."
तेव्हा आईने तसे आधी नाक मुरडले होते की आदि स्वत:च्या पसंतीच्या पोरीशी लग्न करणार म्हणून.तेही दुस-या जातीच्या.
शलाका ही देशस्थ ब्राह्मण आणि आदि हा मराठा.
मुलगी उच्च कुलीन असो वा नसो तिला दुसरा समाज सहसा स्वीकारायला तयार होत नाही. तसेच झाले होते.
आदित्य आईवर खूप प्रेम करत होता. त्यामुळे आईची सहमती अत्यावश्यक होती. आदित्य म्हणाला
"आई, तू एकदा शलाकाला बघ तरी. तुला पसंत नाही पडली तर मी नाही तिच्याशी लग्न करणार..."
सावित्रीबाईंनी विचार केला की बघायला काय जातंय? किमान आदिचे मन राखण्यासाठी एवढेतरी आपण करू शकतो. पण आदित्यला शलाकाबद्दल खात्री होती. तेव्हा आईने शलाकाला बघायचे ठरवले तेव्हाच तो मनातून हसला होता.
आणि आदित्यने जेव्हा शलाकाला आईला भेटण्यासाठी घरी आणले तेव्हा मात्र आईच्या कौतुकाला पारावार राहिला नाही.
शलाका हि दिसायलाही गोरीपान, देखणी, हुशार, आणि संगणक तज्ञदेखील होती.
तिच्या घरंदाज वागण्याला बघून सावित्रीबाईंनी मनोमन हे मान्य केले की अशी देखणी, हुशार आणि मोठ्यांना मान देणारी सून आपण काही आदिसाठी शोधू शकणार नाही.
जणू आईच्या चेह-यावरचे हावभाव वाचूनच आदिने आईला विचारले.
"काय आई, नाही म्हणून सांगू का हिला?"
आई एकदम उत्तरली "काहीतरीच काय म्हणतोस आदी? मला पसंत आहे शलाका."
बोलल्यानंतर एकदम सावित्रीबाईंना उमगले की आपण आपला होकार देऊन बसलो आहोत. आदी हसू लागला-
"मला माहीत होते आई म्हणूनच तर तुला आत्ता विचारले. अजुनही तुझी आकस्मिक प्रश्नाने गडबडून जायची सवय काही गेली नाही."
"अरे लबाडा! असा दावा साधलास होय. माझा गैरफायदा घेतोस होय? थांब बघतेच आता"
असे म्हणत सावित्रीबाई आदिमागे धावल्या.
तेवढ्यात शलाकाने त्यांना पडता पडता वाचवले आणि हसत हसत म्हणाली - "आई, आदिला तुम्ही सोडून द्या, तुमचा राग मी शांत करते." असे म्हणून ती आईच्या पाया पडली.
"सुखाने संसार कर हो मुली" असा अवचितपणे त्यांच्या तोंडून शलाकाला आशिर्वाद दिला गेला.
ते पाहून आदि अजूनच जोरजोरात हसू लागला.
आई म्हणाली - "छान, तुम्ही दोघा मुलांनी माझी चांगलीच फिरकी घेतलीत."

— २ —

लवकरच दोघांचा विवाह सोहळा वैदीक पद्धतीने थाटामाटात पार पडला. लग्नाची सगळी आर्थिक बाब आदित्यने स्वत: संभाळली होती. एकाही पै ची मदत कोणाकडून घेतली नव्हती. लग्नानंतर नोकरी सोडायचा निर्णय हा सर्वस्वी शलाकाचाच होता. आणि आईची काळजी घेण्याच्या दृष्टीने तो आवश्यक देखील होता.

लग्नाला दोनच महिने झाले होते आणि आदित्यला कंपनीने तीन महिन्यांसाठी अमेरिकेला पाठवायचे ठरवले होते.
आई म्हणाली - "गृहलक्ष्मी लाभली हो तुला आदि. शलाकाचा पायगुण खूप चांगला आहे."
खरंतर लग्नाला फक्त दोनच महिने झाले होते आणि आदि अमेरिकेला जाणार म्हणून शलाका हिरमुसली झाली होती.
पण भविष्यकाळाच्या दृष्टीने अमेरिकेची वारी करणे आदिला आवश्यक होते. हे शलाका चांगले समजून होती.
शेवटी तीन महीन्यांची ताटातूट आज संपणार होती.
आदिची फ्लाईट रात्री ११.३० वाजता एअरपोर्टवर येणार होती.आणि ती त्याला रिसिव्ह करायला पण जाणार होती.
सकाळपासूनच ती तयारीला लागली होती. आदिच्या आवडीचे पदार्थ करायचे सर्व ताजे सामान तिने बाजारातून आणले होते.


— ३ —
संध्याकाळी साडे आठला तिचा स्वयंपाक झाला होता. आणि आदिसाठी ती थांबणार असल्याने आईला जेवायला देऊन ती नेहमीप्रमाणे टी.व्हीवर आईसोबत बातम्या पाहू लागली.

तोच बातम्यांमध्ये दुबईवरुन येणारे विमान अपघातग्रस्त झाल्याची बातमी तिला बघायला मिळाली. सर्व प्रवासी मरण पावले होते.मृतांच्या नातेवाईकांसाठी विमानतळावर एक हेल्पलाईन काऊंटर उघडले होते.
संबंधितांनी अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष विमानतळावर चौकशी करावी असे आवाहन करण्यात आले होते.शलाकाच्या काळजात तर एकदम् धस्स झाले.लगेच उठून ती म्हणाली "आई मी आत्ताच एअरपोर्टवर जाऊन येते."

एअरपोर्टजवळच एका सिग्नलपाशी तिला सिग्नल सुटलेला दिसला. तेथे ती थांबली असती तर पुन्हा ४-५ मिनिटे गेली असती. तिने तो सिग्नल पकडता यावा म्हणुन जोरात गाडी घातली. तिची गाडी सिग्नल ओलांडून तर गेली पण त्यावेळी लाल दिवा लागलेला होता, त्यामुळे डाव्या बाजूने येणा-या वोल्व्हो गाडीकडे तिचे लक्षच गेले नाही. तिचे सर्व लक्ष आदिची माहीती घेण्याकडे होते. आणि तिला लवकरात लवकर एअरपोर्टवर पोहोचायचे होते.एखाद्या महामार्गावर एक-दोन सेकंदाचे दुर्लक्ष खपूनही गेले असते. पण शहरातल्या रहदारीत अजिबात नाही.याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
त्या वोल्व्हो गाडीने शलाकाची कार उडवली आणि शलाका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.


— ४ —

पोलिस तेथेच असल्यामुळे त्यांनी शलाकाची पर्स पाहिली तर त्यात त्यांना डॉ.अभिजित देशपांडेंचे कार्ड मिळाले होते.
पोलिसांनी फोनवर शलाकाचे वर्णन सांगताच ते म्हणाले की ती माझ्या परिचयाची आहे. तिला ताबडतोब हिंदुजा रुग्णालयात पाठवा. शलाका रुग्णालयात येईपर्यंत डॉक्टर अभिजीत यांनी ऑपरेशनची सर्व तयारी केली होती तसेच आदिच्या एका मित्राला सांगून आईला देखील रुग्णालयात बोलावून घेतले होते.

आनंदराव सरकारी नोकरीत आरोग्य खात्यात मोठे अधिकारी होते तेव्हाची ही गोष्ट. त्यांनी अभिजीत देशपांडे या हुशार तरुणाला डॉक्टर होण्यासाठी खूप मदत केली होती. आनंदरावांना नेहमीच चांगल्या माणसांची कदर असायची. पैशाअभावी गुणांना वाव मिळत नसेल तर प्रसंगी स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करायचे ते. त्यामुळेच अभिजीत आनंदरावांना खूप मानत असेल. त्यांच्या निधनानंतर देखील तो त्यांचा कुटुंबीयांशी संबंध ठेऊन होता आणि आज त्या उपकारांचा उतराई होण्याची संधी त्याच्यासमोर आलेली होती.

शलाकाला दोन - सव्वा दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर सर्व उपचार करुन तिच्या खोलीत आणण्यात आले.
डॉक्टर अभिजीत आईंना समजावून सांगत होते, पण आईंना अश्रू आवरत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी डॉक्टरांना सांगितले की C.T. Scan चे रिपोर्टस् तयार आहेत. तेव्हा डॉ. अभिजीत गेले होते.
शलाकाचा मोबाईल आईकडेच होता. तो अचानक वाजू लागला. आईला नवलच वाटले. आईला या सगळ्या धामधुमीत शलाकाच्या आई-वडीलांचा विसरच पडला होता. त्यांना शलाकाच्या अपघाताबद्दल त्या काही सांगू शकल्या नव्हत्या.
कदाचित् त्यांचाच फोन असावा म्हणून आईंनी फोन घेतला.


— ५ —

तो काय आश्चर्य आईंना आदित्यचा आवाज ऎकू आला.
"आई! अगं कुठे आहात तुम्ही? घरी कोणी फोन का नाही उचलत?"
"अरे! तु कुठे आहेस?" सावित्रीबाई एकदम उत्तेजित स्वरात म्हणाल्या
"अगं आई मी आत्ताच एअरपोर्टवर आलोय. माझी अमेरिकेची फ्लाईट उशीरा आली त्यामुळे मला दुस-या फ्लाईटने यावे लागले."
"तू लवकर हिंदुजा ला ये बरं, शलाकाला अपघात झालाय, "
"काय? शलाकाला अपघात? कसा झाला आई" आदित्यचा तो जे ऎकत होता त्यावर विश्वास बसत नव्हता.
"अरे तुझ्या दुबईच्या फ्लाईटला झालेल्या अपघाताची बातमी ऎकून ती लगेच एअरपोर्टवर जायला निघाली अन् वाटेत हे झाले.
तू आधी इकडे ये बरं"
"बरं" म्हणून आदित्यने फोन ठेवला. फोन ठेवताच आदित्य फोनच्या जागीच खाली बसला. तो एकदम सुन्न झाला होता.
काय करावे हे त्याला सुचलेच नाही. १० मिनिटांनी जेव्हा सिक्युरिटी गार्डने विचारले, "भईसाहब क्या चाहिये?" तेव्हा तो भानावर आला आणि लगेच त्याने हिंदुजाकडे धाव घेतली.

इकडे C.T. Scan चे रिपोर्टस् पाहून डॉक्टर अभिजीत आईंशी बोलायला आले.
तोपर्यंत सावित्रीबाईंनी शलाकाच्या वडीलांना फोन करुन कळवले होते. आणि ते लगेच पुण्याहून यायला निघाले होते.
"काकू, मी सगळे रिपोर्टस् पाहिले, गाडीने डाव्या बाजूने ठोकर मारल्यामुळे शलाकाला मुका मारच जास्त लागला आहे.
आणि ब-याच ठिकाणी रक्त आले आहे पण त्या दुखापती फारशा गंभीर नाहियेत.
फक्त डोक्याला झालेली दुखापत मला गंभीर वाटत होती म्हणून मी C.T. Scan केले होते.
पण ते रिपोर्टस् देखील एकदम Normal आहेत. मला अजूनही कळत नाहिये की, ती कोमात का गेली आहे"
"काय कोमात?" आई एकदम घाबरुन उद्गारल्या.
"होय कोमात. शलाकाला आदित्यच्या जाण्याचा एकदम मानसिक धक्का बसला आहे, त्यामुळे..."
डॉक्टर अभिजीत यांचे बोलणे आई तोडत मधेच म्हणाल्या.
"पण आदि जिवंत आहे अभिजीत, आत्ताच त्याचा फोन आला होता मला.तो इथेच येतोय"
"मग तर खूप चांगलं झालं. आता आदित्य आल्यावर शलाकाला आपण कोमातून बाहेर आणायचा प्रयत्न करु
आदि आल्यावर डॉ. अभिजीत त्याला म्हणाले - "शलाकाचे सर्व रिपोर्टस् एकदम Normal आहेत. पण शलाका आत्ता कोमात आहे. तिचे डोळे उघडे आहेत, पण त्यांत संवेदना नाहिये आदि."
तू येतोय ही बातमीदेखीला आईंनी शलाकाला सांगितली तरी तिची पापणीदेखील हलली नाही.
आदित्य म्हणाला- "काका मला आधी शलाकाला पहायचंय"


— शेवट —
डॉक्टर त्याला घेऊन शलाकाच्या रुमपाशी आले.
आदित्यला पाहताच आई त्याला बिलगून एकदम स्फुंदून रडायला लागली.
"आदी असं कसं रे झालं हे?" आदिच्या डोळ्यांतून पण अश्रू वहात होते.
पण लवकरच त्याने स्वत:ला आणि आईलादेखील सावरले. आदित्य शलाकापाशी बसला.
तिला हाक मारली."शलाका.....अगं ऎकलस का?"
अगं.... तुझा आदी आलाय...बघ ना माझ्याकडे....
तरीही शलाकाचा प्रतिसाद आला नाही. आदित्यचा कंठ दाटून आला.
तो तिचा हात हातात घेऊन रडू लागला.
एवढा वेळ आवरलेले अश्रू आता अविरत वहात होते.
तेवढ्यात शलाकाचा हात थरथरु लागल्याची जाणीव त्याला झाली. दुसरा हात तिने आदिच्या डोक्यावर ठेवला.
आदिने पाहिले तर शलाका त्याच्याकडे बघून मंदपणे हसण्याचा प्रयत्न करत होती.
डॉक्टर अभिजीत एकदम आनंदाने म्हणाले की "अरे वा....अभिनंदन आदित्य, शलाका कोमातून बाहेर आली. तुझ्या स्पर्शानेच तिला कळाले की तू आला आहेस म्हणून.खरंच स्पर्शात खूप शक्ती असते. कधी कधी आपल्याला बाह्य गोष्टी दिसत नाहित पण स्पर्शाची भाषा मात्र नक्की कळते." यावर शलाकाने हलकेच स्मित केले.
जणू आदिच्या स्पर्शानेच तिला पुनर्जीवन मिळाले होते
तेवढ्यात पुन्हा डॉक्टरांचा आवाज ऎकू आला.
आणि बरं का? या सगळ्या गोंधळात मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो होतो. ती आता सांगतो.
एक गोड मुलगी आई होणार आहे बरं.
"काय?" आ वासून आदित्य आणि आई डॉक्टरांकडे पाहू लागली.
हे खरं होतं की आईला आणि शलाकाला देखील लहान मुले खूप आवडत असल्याने पहिल्या बाळाच्या बाबतीत प्लॅनिंगच्या भानगडीत पडायचे नाही असे आदी आणि शलाकाने ठरवले होते. पण लगेच देव आपल्या पदरी हे दान देईल असे दोघांनाही अपेक्षित नव्हते.
आई लगेच म्हणाली - "बघ हो आदि, मुलाचा पायगुण चांगला आहे. बेट्याने जन्माला येण्याआधीच आपल्या आईला वाचवले."
आईचे हे बोल ऎकताच शलाका आणि आदिच्या ओठांवर हसू उमटले.

लवकरच सकाळपर्यंत शलाकाचे आई-वडील तिच्या आत्याला घेऊन आले.
तेथे येताच त्यांना नातू होणार असल्याची बातमी मिळाली.
दामोदरपंत सावित्रीबाईंना म्हणाले - "अहो केवढे घाबरवून टाकले तुम्ही आम्हाला? आणि येथे बघतो तर काय?
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे"

दामोदरपंतांची ही अस्सल पुणेरी फोडणी ऎकून सगळेच जण हसू लागले...
• • • समाप्त • • •
- सागर भंडारे

© 2006, सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.
या कथेतील कोणताही भाग किंवा कोणतीही कल्पना कोणत्याही कारणासाठी वापरण्यासाठी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे)

सागरकथेवर वाचकांचे स्वागत

नमस्कार मित्रांनो,
केवळ कथेकरिता माझा एक ब्लॉग असावा असे मनात होते. जेणेकरुन वाचकांना केवळ कथांचा निखळ आनंद घेता यावा. असो. तर आज ह्या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या अनेक कथा देण्याचा मानस आहे.
पाहूया कसे जमते ते। :)

सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता। मात्र कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे


धन्यवाद,
सागर भंडारे
© 2006, सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत।